मुंबई, 9 नोव्हेंबर : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या पत्रकार अर्णब गोस्वामी यांचा जामीन अर्ज आज कोर्टाकडून फेटाळण्यात आला. तुरुंगात असलेल्या अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याची परवानगी द्या, अशी मागणी होत आहे. मात्र पोलिसांकडून ही परवानगी देण्यात आली नाही. अशातच आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
'अर्णब गोस्वामी यांच्या प्रकरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोन आला होता. पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना जेलमध्ये जाऊन भेटू द्या, असं त्यांनी सांगितलं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील सर्व जेलमध्ये कोणत्याही कैद्याच्या नातेवाईकांना जेलमध्ये जाऊन भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे अर्णब यांच्या कुटुंबीयांना जेलमध्ये जाऊन भेटता येणार नाही. पण ते फोनवर अर्णव यांच्याशी बोलू शकतात”, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.
सविस्तर भाष्य करणं टाळलं
अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. अर्णब यांच्या अटकेनंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला टार्गेट केलं आहे. मात्र या सगळ्याविषयी सविस्तर भाष्य करणं गृहमंत्र्यांनी टाळल्याचं पाहायला मिळालं. “अर्णब गोस्वामी प्रकरण कोर्टात सुरू आहे. त्यामुळे यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. जो निर्णय घ्यायचा आहे तो कोर्ट घेईल”, असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
नाईक कुटुंबीयांचं महाराष्ट्राला आवाहन
पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्याचा आरोप करत अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. तसंच नाईक यांच्या सुसाईड नोटमध्येही अर्णब यांचं नाव होतं. 2018 साली झालेल्या या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना काही दिवसांपूर्वी रायगड पोलिसांनी अटक केली. त्यानंतर कोर्टाकडून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
'सत्य आपोआप बाहेर पडतं. सत्याचा विजय होते. सत्यासाठी उभे रहा. मराठी माणसांनी पाठिमागे उभे राहावं,' असं भावनिक आवाहन अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी केलं आहे.