मुंबई, 8 मार्च : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात वादग्रस्त ठरलेले हिंदू एकता आघाडीचे कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज इथं झालेल्या या भेटीत मिलिंद एकबोटे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आमंत्रण राज ठाकरे यांना दिल्याचं कळतंय.
पुण्यात 24 मार्चला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी मिलिंद एकबोटे हे राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पोहोचले. राज ठाकरे कार्यक्रमाला जाणार किंवा नाही हे मात्र अद्याप ठरलेलं नाही.
मिलिंद एकबोटे आणि भीमा कोरेगाव प्रकरण
1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी 'शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान'चे संभाजी भिडे गुरूजी आणि मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर यंदा 1 जानेवारीच्या आधी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंसह 163 जणांना पुणे जिल्हाबंदी करण्यात आली होती. कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला होता. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात आली होती.
हेही वाचा- 'अमृता फडणवीस यांना ट्रोल करण्याचा अधिकार', राष्ट्रवादीच्या महिला मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
शरद पवारांनी केला आहे गंभीर आरोप
'भीमा कोरेगाव हा एक वेगळा कार्यक्रम आहे. अनेक वर्षांपासून या कार्यक्रमासाठी लोक कोरेगावात येतात. विजय स्तंभाला अभिवादन करतात. भीमा कोरेगावला येणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. पण यामध्ये संभाजी भिडे आणि हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांच्याकडून वेगळं वातावरण तयार करण्यात आलं,' असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता.