हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणतात,"...तेव्हा कामगाराच्या कानशिलात मारावी वाटते"

हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणतात,

मेट्रो ३ चं रात्री काम सुरू असल्यानं त्याच्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत असल्याच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी हे मत व्यक्त केलं आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई

19 सप्टेंबर : मुंबईत मेट्रोचं अगदी सकाळी काम सुरू असताना तिथं काम करणारे कामगार जसे ओरडत असतात, फोनवर मोठ्यानं गाणी लावून ऐकत असतात ते पाहून त्यांना जाऊन कानशिलात मारावी असं वाटतं असं मत मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांनी व्यक्त केलं आहे.

मेट्रो ३ चं रात्री काम सुरू असल्यानं त्याच्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत असल्याच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी हे मत व्यक्त केलं आहे. या याचिकेवर मेट्रो ३ चं काम रात्री करण्यास कोर्टाने यापूर्वी बंदी घातली होती, ती बंदी आज आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवण्यात आली आहे. तसंच या प्रकल्पासाठी लागणाऱ्या मालाची ने आण करण्यासाठी अवजड वाहनं आणण्यालाही कोर्टाने परवानगी नाकारली आहे.

मुंबई मेट्रो ३ चं काम रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत करण्यास मुंबई हायकोर्टानं बंदी घातली आहे. रात्री काँक्रीटकरणाचं काम सुरू असतं त्यामुळे त्यातून होणाऱ्या आवाजाचा त्रास आसपासच्या रहिवासियांना होत असतो अशी याचिका कफ परेड इथं राहणारे राॅबिन जयसिंघानी यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे. जेव्हापासून इथं काम सुरु आहे तेव्हापासून ध्वनीप्रदुषणाचे सगळे नियम पायदळी तुडवले जात असून याबद्दल पोलिसांसह इतर यंत्रणांना तक्रार करुनदेखील काही फरक पडला नसल्यानं याचिका दाखल केली असल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलं. ज्या दिवसापासून हे काम सुरु झालं आहे तेव्हापासून हा त्रास होत असल्यानं प्रतिदिवशी १० हजार रुपये अशी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 07:25 PM IST

ताज्या बातम्या