पश्चिम रेल्वेवर हाय अलर्ट, लोकल मार्ग उडवून देण्याच्या धमकीनंतर कडक सुरक्षाव्यवस्था

पश्चिम रेल्वेवर हाय अलर्ट, लोकल मार्ग उडवून देण्याच्या धमकीनंतर कडक सुरक्षाव्यवस्था

दहशतवादी संघटनांकडून मुंबईतील लोकल मार्ग उडवून देण्याचा अॅलर्ट आल्याने पश्चिम रेल्वेचा मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्यात येत आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 जून : दहशतवादी संघटनांकडून मुंबईतील लोकल मार्ग उडवून देण्याचा अॅलर्ट आल्याने पश्चिम रेल्वेचा मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाकडून रेल्वे रूळ उडवून देण्याचा कट शिजत असल्याचा संदेश बुधवारी फिरला. वरिष्ठ पातळीवर आलेल्या या ईमेलनंतर तातडीने योग्य उपाययोजना हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आतापर्यंत मुंबईनं अनेक दहशतवादी हल्ले सहन केलेत. 2006साली पश्चिम रेल्वेतल्या 7 लोकलमध्ये प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब ठेवून अतिरेक्यांनी स्फोट घडवला होता. लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात हे स्फोट झाले होते. यात 189 निष्पापांचा जीव गेला होता. तर 824 जण जखमी झाले होते.

11 जुलै 2006 रोजी संध्याकाळी गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेत 10 मिनिटांच्या अंतरात हे स्फोट झाले होते. मुंबईतल्या खार रोड-सांताक्रूझ दरम्यान पहिला, तर वांद्रे-खार रोडदरम्यान दुसरा, बाँबस्फोट झाला. जोगेश्वरीला तिसरा आणि माहिम जंक्शनदरम्यान चौथा बॉम्बस्फोट झाला. मीरा रोड ते भाईंदरदरम्यान पाचवा तर माटुंगा रोड ते माहिमदरम्यान सहावा बॉम्बस्फोट झाला. तर बोरिवलीला सातवा स्फोट झाला होता.

शिवाय 2008मध्ये 26/11 हल्ला तर मुंबई कधीच विसरू शकणार नाही. त्यात 166 लोकांचा जीव गेला होता. हे सगळे अनुभव लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं हाय अॅलर्ट घोषित केलाय.

First published: June 15, 2018, 11:02 AM IST

ताज्या बातम्या