जाता जाता झोडपणार! राज्यात आठवडाभर मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा

जाता जाता झोडपणार! राज्यात आठवडाभर मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा

काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई 11 ऑक्टोबर: मान्सून आता परतीच्या मार्गावर आहे. मात्र जाणारा हा पाऊस पुन्हा एकदा राज्याला झोडपण्याची शक्यता आहे. या आठवडाभर राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार (Heavy to very heavy rains) पावसाचा इशारा वेधशाळेने (IMD Alert) दिला आहे. 11 ते 17 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात कोकणसह आतल्या भागात पाऊस पूर्णपणे सक्रीय राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. कापणीला आलेल्या पिकांवर त्याचा दाट प्रभाव होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थोडी उसंत घेतली होती. मात्र वातावरण बदलल्याने पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे. सोयाबीनसह अनेक पिकं ही काढणीला आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना झाडावरच कोंबं फुटली आहेत. त्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा आहे. भाजीपाला आणि इतर फळपिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे.

आता मजुरांची कमतरता असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कोरोनाचं संकट, बाजारातली मंदी, मजुरांची कमतरता यामुळे मार्ग कसा काढायचा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

पुणे शहराच्या अनेक भागात शनिवारी दुपारी आकाश अचानक भरून आलं आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पण पुढचा आठवडाही असंच वातावरण राहणार आहे, त्यामुळे सावध राहा असं वेधशाळेने म्हटलं आहे. अंदमानजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा अधिकाधिक तीव्र होत असल्याने महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना धोका असल्याची वेधशाळेची माहिती आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 11, 2020, 2:47 PM IST

ताज्या बातम्या