मुंबई, 24 जुलै : मुंबई आणि परिसरात मंगळवारी (23 जुलै) रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. रात्री झालेल्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. यादरम्यान, हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे टिळक नगर, अंधेरी पूर्वेकडील मरोळ, सातबाग, परळमधील हिंदमाता, सायन, सायन रेल्वे ट्रॅकवर पावसाचं पाणी साचलं आहे. गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. चक्रीवादळाच्या स्थितीमुळे मुंबई आणि परिसरात पुढील दोन कोसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कुलाबा परिसरात 171 मिमी पाऊस तर सांताक्रुझ परिसरात 58 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईच्या तुलनेत राज्यातील रायगड आणि रत्नागिरीमध्ये बुधवारी (25 जुलै) आणि गुरुवारी (26 जुलै) अती जोरदार पाऊस होईल, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं मंगळवारी रात्रीपासून दमदार हजेरी लावली. दरम्यान, पावसाचा जोर कायम असला तरीही रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहेत. तिन्ही रेल्वे मार्गावर कोणताही परिणाम झालेला नाही.