मुंबई, 06 नोव्हेंबर: सध्या लक्षद्विप आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच लक्षद्विप आणि कर्नाटक किनारपट्टी परिसरात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण (Rain in Maharashtra) झाली आहे. पुढील तीन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा (Thunderstorm and lightning) इशारा हवामान खात्याने (IMD) दिला आहे.
आज सकाळपासूनचं मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, घाट परिसर, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. येत्या काही तासांत संबंधित जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सायंकाळी राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा आणि नाशिक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. ऐन दिवाळीच्या दिवासात अचानक पावसाने एन्ट्री मारल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पुरती धांदल उडाली आहे.
हेही वाचा-कोरोना परत आला; 24 तासात या देशात सापडले तब्बल 37,120 नवीन रुग्ण!
नाशिक शहराला काल मुसळधार पावसानं झोडपलं आहे. काल मध्यरात्रीपर्यंत शहरात 31.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर, मान्सून हंगाम संपल्यानंतर शहरात आतापर्यंत 71.3 मिमी पाऊस कोसळला आहे. तसेच किमान तापमानात 3 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा-सावधान! माणसांपाठोपाठ आता पाळीव प्राण्यांमध्ये आढळला कोरोनाचा 'अल्फा' व्हेरिएंट
पण रविवारीपासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. रविवारी राज्यात सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतच पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त रविवारी पुणे, रायगड, सांगली, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weather forecast, महाराष्ट्र