मुंबई उपनगरं, ठाणे आणि नवी मुंबईत क्लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा

मुंबई उपनगरं, ठाणे आणि नवी मुंबईत क्लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा

  • Share this:

विवेक कुलकर्णी, 09 जून : ठाणे आणि नवी मुंबईत क्लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई हायकोर्टाने या संदर्भातली स्थगिती उठवण्याची राज्य सरकारची विनंती मान्य केली आहे. या सगळ्या भागांचा सामूहिक विकास करण्यासाठी १ चा एफएसआय ४ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. पण यामुळे या सगळ्या भागातील पायाभूत सोयीसुविधांवर ताण पडेल अशी याचिका दत्तात्रय दौंड यांनी मुंबई हायकोर्टात केली होती. त्यानुसार जुलै २०१४ मध्ये मुंबई हायकोर्टानं एफएसआय वाढवण्यापूर्वी इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तयार करावेत आणि तोपर्यंत एफएसआय वाढवण्याचा निर्णय घेण्यास कोर्टाने मनाई केली होती.

नवी मुंबईतील सामूहिक विकासासंदर्भात एफएसआय वाढवून देण्यातकरता हायकोर्टानं आपला आदेश मागे घ्यावा अशी विनंती राज्य सरकारनं केली होती. नवी मुंबई संदर्भात तेथील महापालिकेनं आणि औद्यौगिक विकास महामंडळानं अभ्यास करुन अहवाल तयार केला असून वाढीव एफएसआयनं या भागातील पायाभूत सोयीसुविधांवर ताण येणार नाही हे या अहवालातून स्पष्ट झालं असल्याचं राज्य सरकारनं कोर्टाला सांगितलं. हा अहवाल तयार होत असताना लोकसंख्येत होणारे बदल लक्षात घेण्यात आले असून एफएसआय वाढवून देण्यात कोणतीही अडचण नाही असं राज्य सरकारनं म्हटलं होतं.

जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करणं हे अनेकांना शक्य नसतं त्यामुळे खासगी विकासकांची मदत घेऊन सामूहिक विकास करणं आवश्यक असल्याचंही राज्य सरकारनं म्हटलं होतं. राज्य सरकारनं मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, मीरा-भाईंदर, नालासोपारा, भिवंडी-निजामपूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कुळगांव, बदलापूर, पालघर, डहाणू, जव्हार या सगळ्या भागांत सामूहिक विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. या सगळ्या मनपांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं होतं.

First published: June 9, 2017, 2:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading