मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या हर्षल रावतेचा मृत्यू

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून एका तरूणाने उडी मारल्याने या परिसरात एकच खळबळ माजलीय. हर्षल रावते असं या तरुणाचं नाव असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Feb 8, 2018 07:54 PM IST

मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या हर्षल रावतेचा मृत्यू

08 फेब्रुवारी, मुंबई : मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून एका तरूणाने उडी मारल्याने या परिसरात एकच खळबळ माजलीय. हर्षल रावते असं या तरुणाचं नाव असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. मंत्रालय परिसरात आत्महत्या अथवा आत्महत्येचा प्रयत्न करण्याची गेल्या पंधरा दिवसातली ही सलग चौथी घटना आहे. हा तरुण पैठणच्या खुल्या कारागृहात मेव्हणीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सध्या तो पॅरोलवर बाहेर आला होता. मंत्रालयात तो गृहविगागात वयक्तिक कामासाठी आल्याचं सांगितलं जातंय.

याआधी धर्मा पाटील या वृद्ध शेतकऱ्याने विष प्राशन केलं. त्यातच त्यांचा अंत झाला. त्यानंतर दुसऱ्या एका तरूणाने अशाच पद्धतीने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला वेळीच रोखलं म्हणून त्याचा जीव वाचला, अगदी कालही एका जणाने मंत्रालयाच्या गार्डन गेटसमोर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.ही तिन्ही प्रकरणं शांत होत नाही तोच आज हर्षल रावते या तरूणाने थेट सहाव्या मजल्यावरून उडी मारलीय. त्याने हे कृत्य नेमकं कशासाठी केलंय हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी विरोधकांकडून हा सरकारविरोधातलाच वाढता रोष असल्याचा आरोप केलाय.

दरम्यान, ही घटना घडताच अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे आणि जयंत पाटील या विरोधी पक्षनेत्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतलीय. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही घटनास्थळी भेट दिलीय. हर्षल रावते या तरुणाला उपचारार्थ सेंट जॉर्जमध्ये दाखल करण्यात आलंय. मात्र डाॅक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. धर्मा पाटलांनंतर हर्षल रावते या तरुणानेही मंत्रालयाच्या दारातच जीव दिल्याने, गावाकडील शेतकरी आत्महत्येचं लोण आता थेट मंत्रालयातच पोहोचल्याची टीका  विरोधकांकडून व्यक्त होतेय.

या घटनेमुळे फडणवीस सरकारच्या चिंतेत आणखीनच भर पडल्याचं चित्रं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर थेट मंत्रालयातच पीडित आत्महत्येचा प्रयत्न करू लागल्याने फडणवीस सरकारसाठी ही निश्चितच धोक्याची घंटा मानली जातेय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2018 07:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...