मुंबई, 08 नोव्हेंबर: सध्या अरबी समुद्रात (Arabian Sea) हवेच्या कमी दाबाचा पट्टा (Low pressure area) निर्माण झाला आहे. हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र आणखी तीव्र होतं आहे. सुदैवाची बाब म्हणजे हे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात आहे. असं असलं तरी कोकण किनारपट्टीवर याचा परिणाम जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आणि उद्या (8 आणि 9 नोव्हेंबर) कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता (Rain in konkan) हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 48 तास कोकणासाठी महत्त्वाचे आहेत.
रविवारी सकाळपासून मुंबईसह कोकण किनारपट्टीवर ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. रविवारी मुंबईसह कोकण आणि गोव्यात बहुतांशी ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस राज्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे. मुंबईसह कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 48 तास कोकणासाठी महत्त्वाचे आहेत.
हेही वाचा-कोरोना परत आला; 24 तासात या देशात सापडले तब्बल 37,120 नवीन रुग्ण!
रविवारी संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरण होते. याचा प्रभाव पुढील दोन दिवस कायम राहणार असून 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होत आहे. परिणामी अरबी समुद्रात 8, 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग ताशी 80 ते 90 किमी इतका राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे.
हेही वाचा-सावधान! माणसांपाठोपाठ आता पाळीव प्राण्यांमध्ये आढळला कोरोनाचा 'अल्फा' व्हेरिएंट
दुसरीकडे, दक्षिणेत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नईत पुरस्थिती निर्माण झाली आहे. नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यानंतर, चेन्नईला ईशान्य मान्सूनच्या पावसाने झोडपून काढलं आहे. चेन्नईतील अनेक रस्ते जलमय झाल्याने नागरिकांची पुरती धांदल उडाली आहे. तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Weather forecast, महाराष्ट्र