Home /News /mumbai /

कोरोना संकटकाळात बेरोजगारांना मोठा दिलासा, 53 हजार जणांना मिळाला रोजगार

कोरोना संकटकाळात बेरोजगारांना मोठा दिलासा, 53 हजार जणांना मिळाला रोजगार

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

विविध उपक्रमांच्या आधारे 53 हजार 41 इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

  मुंबई, 29 सप्टेंबर : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे 53 हजार 41 इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. फक्त ऑगस्ट महिन्यात 13 हजार 754 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. तत्पुर्वी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात 39 हजार 287 बेरोजगारांना रोजगार मिळाला, असा दावाही मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते असंही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. ऑगस्टमध्ये या वेबपोर्टलवर 37 हजार 320 इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात 6 हजार 710, नाशिक विभागात 5 हजार 687, पुणे विभागात 12 हजार 523, औरंगाबाद विभागात 7 हजार 88, अमरावती विभागात 2 हजार 349 तर नागपूर विभागात 2 हजार 963 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. ऑगस्टमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 13 हजार 754 उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात 2 हजार 177, नाशिक विभागात 1 हजार 764, पुणे विभागात 6 हजार 320, औरंगाबाद विभागात 2 हजार 932, अमरावती विभागात 110 तर नागपूर विभागात 451 इतके बेरोजगार उमेदवारांचा समावेश आहे.  कौशल्य विकास विभागाने लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात 76 ऑनलाईन रोजगार मेळावे झाले. ऑगस्टमध्ये झालेल्या मेळाव्यांमध्ये 128 उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील 13 हजार 894 जागांसाठी त्यांनी ऑनलाईन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये १० हजार ३३२ नोकरी इच्छूक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत 1 हजार 289 तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरु आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरी इच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी असं आवाहन मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Unemployment

  पुढील बातम्या