अंगणवाड्यांच्या जागाभाड्यात वाढ करण्यास सरकारकडून मान्यता, अशी आहे नवीन भाडे वाढ!

अंगणवाड्यांच्या जागाभाड्यात वाढ करण्यास सरकारकडून मान्यता, अशी आहे नवीन भाडे वाढ!

यापूर्वी सर्वच क्षेत्रातील खासगी जागेत भरणाऱ्या अंगणवाड्यांना सरसकट 750 रुपये जागाभाडे दिले जात होते.

  • Share this:

मुंबई, 20 जानेवारी : राज्यातील खासगी इमारतीत भरणाऱ्या अंगणवाड्यांच्या जागाभाड्यात भरीव वाढ करण्यास मान्यता देण्यात आली असून ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रासाठी 1 हजार रुपये, नागरी क्षेत्रासाठी 4 हजार तर महानगर क्षेत्रामध्ये 6 हजार रुपये इतके नवीन भाडे असणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ॲड. ठाकूर या महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा आणि कामकाजाचा आढावा घेत आहेत. या आढाव्यादरम्यान राज्यातील एकूण अंगणवाड्यांपैकी 37 हजार 545 अंगणवाड्या या खासगी इमारतीत भरत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. भाड्यापोटी अत्यल्प रक्कम दिली जात असल्यानं आवश्यक सोई- सुविधांयुक्त इमारत अंगणवाडी केंद्रांसाठी उपलब्ध होत नव्हती. ही माहिती मिळताच खासगी इमारतीत भरणाऱ्या अंगणवाड्यांसाठी भाड्याच्या रक्कमेत वाढ करण्याचे निर्देश ठाकूर यांनी दिले.

यापूर्वी सर्वच क्षेत्रातील खासगी जागेत भरणाऱ्या अंगणवाड्यांना सरसकट 750 रुपये जागाभाडे दिले जात होते. आता यापुढे ग्रामीण भागातील अंगणवाड्यांच्या जागाभाड्यात 250 रुपयांची वाढ करुन ते 1 हजार रुपये, नागरी क्षेत्रात 3 हजार 250 रुपयांची वाढ करुन 4 हजार रुपये तर महानगर क्षेत्रात 5 हजार 250 रुपये अशी भरीव वाढ करुन 6 हजार रुपये करण्यात मान्यता देण्यात आली आहे.

यामुळे अंगणवाड्यांना सर्वसुविधायुक्त इमारती मिळणे शक्य होणार असून पर्यायाने बालकांचे हसत- खेळत शिक्षण यासह सर्वांगीण विकासासाठी उत्तम वातावरण मिळेल, असा विश्वासही महिला व बालविकास मंत्र्यांनी व्यक्त केला.

First published: January 20, 2020, 8:38 AM IST
Tags:

ताज्या बातम्या