मुंबई, 14 ऑक्टोबर : हिंदुत्वाच्या मुद्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वाद पेटला आहे. या भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. या वादात भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यांच्या या टीकेला सेनेच्या नेत्या विशाखा राऊत यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.
'अमृता फडणवीस या काही भाजपच्या प्रवक्त्या नाही. त्या फक्त माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी आहेत. जर त्या भाजपच्या नेत्या किंवा नगरसेवक सुद्धा असत्या तर आम्ही ऐकलं असतं. पण, अमृता फडणवीस यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही तोंड उघडले तर तुम्हाला तोंड लपवायला जागा ठेवणार नाही' अशा शब्दांत विशाखा राऊत यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली.
आमच्या महिला आघाडी समोर येवून बोलून दाखवावा, सेनेच्या नेत्या विशाखा राऊत यांचं आमृत फडणवीस यांना खुले आव्हान pic.twitter.com/gSepC4bWeU
— News18Lokmat (@News18lokmat) October 14, 2020
'तुम्ही राजकारणात कधी आला? तुमचे पती जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा राजकारणात दिसायला लागल्यात. शिवसेना ही अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. ठाकरे घराण्याची चौथी पिढी ही राजकारणामध्ये आहे. त्यामुळे आम्ही काय करावे, हे आम्हाला शिकवू नये, आम्हाला संस्कृती आहे. त्यामुळे आम्हाला बोलायला भाग पाडू नये, जर बोलायचं असेल तर आमच्या महिला आघाडी समोर येवून बोलून दाखवावे', असं जाहीर आव्हानच विशाखा राऊत यांनी दिले आहे.
अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली होती. 'बार आणि दारूची दुकाने सगळीकडे सुरू झाली आहेत आणि मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? काही विचित्र लोकांकडे कधी विवेकी असल्याचं सिद्ध करणारं सर्टिफिटेक मागावंसं वाटतं', असं ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. याआधीही अमृता फडणवीस यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर शिवसेनेवर एकदाही टीकेची संधी सोडली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.