मुंबई 29 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबाबत (Governor nominated MLA list ) राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. त्यावर महाआघाडीत महामंथनही झालं. आता अखेर ती यादी तयार झाली असून यादी घेऊन जेष्ठ मंत्र्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat singh koshyari) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या यादीत कोण कोण असतील याची जोरदार चर्चा सध्या सुरू असून अनेक नावं चर्चेत आहेत.
अनेक दिवसांच्या चर्चेनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत नावांना मान्यता देण्यात आली. यात 12 नावे असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून ही यादी तयार केली आहे. यात अनेक नवीन चेहेरे असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
या नावांना राज्यपाल मान्यता देतील का असे प्रश्न विचारण्यात येत आहेत. सध्या राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये काहीसं तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे राज्यपालांनी आक्षेप घेतला तर काय करायचं याचीही योजना महाआघाडीने तयार केली आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी काँग्रेसकडून नवीन नावं समोर, काहींना मिळणार डच्चू?
कला, साहित्य, संस्कृती, समाजसेवा, क्रीडा अशा क्षेत्रातल्या मान्यवरांची आमदार म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार राज्यपालांना आहेत. राज्यमंत्रिमंडळ या मान्यवरांची नावं निश्चित करतं आणि ती राज्यपालांकडे पाठवली जातात.
राज्यपालांनी त्याला मान्यता द्यावी असे संकेत असले तरी त्यावर राज्यपाल आक्षेप घेऊ शकतात. त्यामुळे आता राज्यपाल कुठली भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, भाजपला धक्का देत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तसंच सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे देखील राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार होतील, अशी चिन्ह आहेत.
'शरद पवारांशी बोला', भेटीला आलेल्या राज ठाकरेंना राज्यपालांचा सल्ला
तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्वात जवळचे सहकारी मानले जाणारे मिलिंद नार्वेकर हेदेखील विधीमंडळात दिसू शकतात. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत शिवसेनेकडून त्यांचं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्यासाठी माघार घेणाऱ्या माजी आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांनाही शिवसेनेकडून संधी दिली जाऊ शकते, असं बोललं जात आहे.