प्रकृती बिघडल्याची चर्चा, स्वत: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीच आता केला खुलासा

प्रकृती बिघडल्याची चर्चा, स्वत: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीच आता केला खुलासा

कोरोना चाचणीच्या अहवालाबाबत स्वत: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माहिती दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रकृतीवरून काही उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. तसंच ते आयसोलेशनमध्ये असल्याचं बोललं जात होतं. मात्र या सगळ्या चर्चांबाबत आणि त्यांच्या कोरोना (Coronavirus) चाचणीच्या अहवालाबाबत स्वत: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी माहिती दिली आहे.

आपल्या प्रकृतीसंदर्भात प्रसार माध्यमांत काही ठिकाणी प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असल्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे.

‘आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. करोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. मात्र, इतरत्र असलेली परिस्थिति पाहून आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहो. या संदर्भात आपल्या प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वृत्त निराधार आहे. आपली तब्येत चांगली आहे,' असे राज्यपालांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केलं आहे.

मुंबईतून दिलासादायक माहिती

'चेस द व्हायरस', ट्रेसिंग – ट्रॅकींग – टेस्टींग – ट्रिटिंग या चतु:सूत्रीनुसार अविरतपणे करण्यात येत असलेली कार्यवाही, मिशन झिरो, अव्याहतपणे सुरु असलेल्या गृहभेटी, बहुस्तरीय पद्धतीने सातत्याने करण्यात येत असलेली नागरिकांची पडताळणी, मुंबई पोलीसांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना; यासारख्या विविध बाबींचे नियोजन व व्यवस्थापन महापालिकेद्वारे सुव्यवस्थितपणे करण्यात येत आहे. त्याचबरोबर बाधित किंवा संशयित रुग्णांवर अधिक परिणामकारक वैद्यकीय उपचारांच्या दृष्टीने महापालिकेने आपल्या 4 प्रमुख सर्वेापचार रुग्णालयांसह 16 उपनगरीय रुग्णालयांमध्ये समर्पित सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध सार्वजनिक रुग्णालयांमध्ये व खासगी रुग्णालयांमध्ये देखील वैद्यकीय सुविधांचे नियोजनपूर्वक सुव्यवस्थापन करण्यात येत आहे.

या व्यतिरिक्त विविध संस्थांच्या सहकार्याने तात्पुरत्या स्वरुपात 10 ठिकाणी उभारलेल्या कोविड समर्पित उपचार केंद्रांच्या माध्यमातून (जम्बो फॅसिलिटी) देखील वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. या नुसार विविध स्तरीय उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने चाळीशी पार केली होती. आता याच श्रृंखलेत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने आज 50 दिवसांचा टप्पा गाठत 'अर्धशतक' केले आहे. तर रुग्ण वाढीचा वेग देखील 1.72 टक्क्यांवरुन 1.39 टक्क्यांवर आला आहे, अशी माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 12, 2020, 2:34 PM IST

ताज्या बातम्या