Home /News /mumbai /

बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करुन एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रिपदाची शपथ

बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करुन एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रिपदाची शपथ

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

    मुंबई, 30 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Aanand Dighe) यांना वंदन करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मुंबईतील राजभवनात दरबार हॉलमध्ये हा शपथविधी कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. एकनाथ शिंदे यंच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या कार्यक्रमाला भाजपचे काही नेते, पत्रकार उपस्थित होते. "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वरसाक्षी शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झालं आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा राखीन. मी भारताची सार्वभौमत्व आणि एकात्मता राखीन. मी महाराष्ट्राच्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि शुद्ध बुद्धीने पार पाडेन. संविधान आणि कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे, तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकष न बाळगता न्यायाची वागणूक देईन", अशी शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी होण्यास इच्छूक नव्हते. पण भाजपच्या वरिष्ठांनी आग्रह केल्याने त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. (एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, शरद पवारांना आनंद, Tweet मध्ये म्हणाले...) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत घोषणा केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (Maharashtra Deputy CM) होतील, अशी माहिती नड्डा यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्याआधी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshari) यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राजभवनातच पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली. तसेच आपण मंत्रिमंडळात राहणार नाही. आपण मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून सरकारला पाठिंबा देवू, मंत्रिमंडळात शिवसेना आणि भाजपचे आमदार असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. पण त्यानंतर आता भाजपच्या केंद्रीय कमिटीने फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्याचा आग्रह केला आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच फडणवीसांना मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी आग्रह केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. "भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांची महाराष्ट्राप्रती असणारी खरी निष्ठा आणि सेवेच्या समर्पणासाठी असणारी तयारी दर्शवते. त्यामुळे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन", असं अमित शाह ट्विटरवर म्हणाले.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shiv sena

    पुढील बातम्या