मुंबई, 21 ऑक्टोबर : मंदिरं उघडण्याच्या मुद्यावरून झालेल्या पत्र व्यवहारानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बराच वाद पेटला होता. या वादामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येण्याचे टाळले आहे. मुंबईतील असलेल्या पोलीस स्मृती दिन 2020 कार्यक्रमाला राज्यपाल गैरहजर राहिले आहे.
मुंबईत आज सकाळी 07.00 वाजता हुतात्मा मैदान, नायगाव पोलीस मुख्यालय इथं 'पोलीस स्मृती दिन' मानवंदना कवायतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्रचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक हजर होते.
राजशिष्टचारानुसार, राज्यपालांना या कार्यक्रमाला हजर राहणे गरजेचं होतं. परंतु, या कार्यक्रमाकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सपशेल पाठ फिरवली. मुंबईत कार्यक्रम असून सुद्धा राज्यपाल या कार्यक्रमाला आले नाही. उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला हजर असल्यामुळे राज्यपालांनी त्यांच्यापासून दूर राहण्याचा पवित्रा घेतल्याचं दिसून आले आहे. राज्यपालांच्या गैरहजेरीमुळे राज्यपाल अजूनही नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.
काय आहे वाद?
राज्यात मंदिरं उघडण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्रात राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे. 'ठाकरे, तुम्ही कट्टर हिंदुत्व विचारांचे आहात. तुम्ही अयोध्या राम मंदिरला गेला होता. मुख्यमंत्री झाल्यावर आषाढी एकादशी पंढरपूर येथे पूजा केली' अशी आठवणच राज्यपालांनी करून दिली होती. खुद्द राज्यपालांनी अशा शब्दांत पत्र लिहिल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
तर, 'आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून पलटवार केला होता.
विशेष म्हणजे, राज्यपाल कोश्यारी यांनी मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही नाराजी व्यक्त केली होती.