'गुडविन'च्या मालकाची मर्सिडीज जप्त.. पलावा सिटीतील 2 फ्लॅट्सही केले सील

'गुडविन'च्या मालकाची मर्सिडीज जप्त.. पलावा सिटीतील 2 फ्लॅट्सही केले सील

जास्त व्याजाच्या आमिषापोटी ग्राहक त्यांचे कष्टाचे पैसे गुंतवतात. मात्र, कमी वेळेत जास्त पैसे मिळवण्याच्या मोहातून अनेकदा फसवणूक होते.

  • Share this:

प्रदीप भणगे,(प्रतिनिधी)

कल्याण,31 ऑक्टोबर: गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरणात पोलिसांनी धडक कारवाईला सुरूवात केली आहे. गुडविनच्या मालकाची महागडी मर्सिडीज गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात ही गाडी ठेवण्यात आली आहे.

गुडविनचा मालक सुनील कुमार याच्या नावावर ही गाडी रजिस्टर आहे. ही गाडी एका मोठ्या गुंतवणूकदाराला गॅरंटी म्हणून देण्यात आली होती. मात्र, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही गाडी पोलिसांनी जप्त केली. सोबतच गुडविन ज्वेलर्सच्या मालकांचे पलावा सिटीतले दोन फ्लॅट्सही पोलिसांनी सील केले आहेत. आता या मालमत्ता जप्त करून त्यातून तरी आपली गुंतवणूक परत मिळते का? याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

'गुडविन ज्वेलर्स'ने काय दिली होती स्किम?

गुडविन ज्वेलर्सच्या विरोधात आतापर्यंत शेकडो नागरिकांनी तक्रार दाखल केली आहे. सुमारे 1 कोटीपेक्षा जास्त रक्कमेची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर 50 कोटींची खंडणी मागितल्यामुळे सुरक्षित ठिकाणी स्थळी असल्याचे गुडविन ज्वेलर्सच्या मालकांनी स्पष्ट केले आहे. तसेच ग्राहकांचे पैसे परत करण्याचा शब्दही देण्यात आला.

गुडविन ज्वेलर्सच्या विरोधात ग्राहक तक्रारी दाखल करत आहेत. 18 टक्के दराने व्याज देण्याचे आमिष सुनील नायर आणि सुधीर नायरने दाखवले होते. त्यांच्यावर ग्राहकांनी विश्वास ठेवला. मात्र, ते दोघेच फरार झाले. पण आता त्या दोघांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात 50 कोटींची खंडणी मागण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मालमत्ता विकून ग्राहकांचे पैसे परत करू, असा दावाही त्यांनी केला आहे.

ग्राहकांनी सोनं, हिरे आणि भिशीमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र,आता गुडविन ज्वेलर्सला टाळे लागल्याने ग्राहकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. लाखोंची गुंतवणूक केल्यानं ग्राहक हवालदिल झाले आहे. पोलिसांनी या प्रकणाचा तपास सुरू केला आहे. फसवणुकीच्या रक्कमेचा आकडा मोठा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जास्त व्याजाच्या आमिषापोटी ग्राहक त्यांचे कष्टाचे पैसे गुंतवतात. मात्र, कमी वेळेत जास्त पैसे मिळवण्याच्या मोहातून अनेकदा फसवणूक होते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी ग्राहकांनी सर्व बाबी तपासून घेण्याची गरज आहे.

VIDEO:राज्यपालांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Published by: Sandip Parolekar
First published: October 31, 2019, 9:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading