गुडविन ज्वेलर्स मालक बंधुंच्या मुसक्या आवळल्या, दीड महिन्यापासून होते फरार

गुडविन ज्वेलर्स मालक बंधुंच्या मुसक्या आवळल्या, दीड महिन्यापासून होते फरार

1154 गुंतवणुकदारांची जवळपास 25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप

  • Share this:

अजित मांढरे,(प्रतिनिधी)

ठाणे,13 डिसेंबर: गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनीलकुमार मोहनन अकराकरण आणि सुधीरकुमार मोहनन अकराकरण या दोघांच्या ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी मुसक्या आवळल्या. अकराकरण बंधू मागील दीड महिन्यापासून फरार होते. 1154 गुंतवणुकदारांची जवळपास 25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयातील डोंबिवली, नौपाडा आणि शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये या दोघांच्या विरोधात गुंतवणूकदारकडून अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गेल्या दीड महिन्यांपासून फरार असलेले गुडविन ज्लेर्सचे मालक सुनीलकुमार अकराकरण आणि सुधीरकुमार अकराकरण हे दोघे ठाणे कोर्टाला शरण येऊन अटकपूर्व जामिनावर बाहेर राहण्यासाठी पळवाटा शोधत होते. शुक्रवारी दुपारी दोघेही कोर्टात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कोर्टात हजर होण्यापूर्वीच ठाणे पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळत त्यांना बेड्या ठोकल्या.

ठाणे पोलीस आयुक्तालयातील डोंबिवली, नौपाडा, शिवाजीनगर पोस्ट येथे मेसर्स गुडविन ज्वेलर्स यांचे सोन्याचे दागिने विकण्याचे तीन शोरूम होते. सोन्या चांदीचे दागिने विक्री करताना त्यांनी स्थानिक लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून रोख रक्कम तसेच सोने खरेदीकरता आगाऊ रक्कम स्विकारण्यास सुरूवात केली. अशाप्रकारे त्यांनी ठाणे आयुक्तालयातील सुमारे 1154 गुंतवणूकदारांकडून अंदाजे 25 कोटी रूपये स्विकारले व गुंतवणुकदारांना कबुल केल्याप्रमाणे परतावा न देता 21 ऑक्टोबर 2019 रोजी दुकाने बंद करून दुकानाचे मालक सुनीलकुमार अकराकरण, चेअरमन सुधीरकुमार अकराकरण हे कुटुंबासह पसार झाले. त्यांच्याविरूद्ध ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये डोंबिवली, नौपाडा व शिवाजीनगर येथे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हा दाखल केल्यापासून पोलिस अकराकरण बंधूंचा शोध घेत होते. मागील दीड महिन्यांपासून ठाणे गुन्हे शाखा व आर्थिक गुन्हे शाखा यांचे पथक त्यांचे मुळ गावी जिल्हा त्रिशुर, राज्य केरळ येथे तळ ठोकून होते. त्यांनी स्थानिक जनतेच्या मदतीने, त्याच्या चालकांच्या मदतीने तसेच नातेवाईकांच्या मदतीने शोध मोहीम हाती घेतली होती. त्याद्वारे त्यांचा शोध घेऊन त्यांच्या मालकीची मालमत्ता, बँक खाते इत्यादी सर्व गोठवण्यात आले होते. यामध्ये शोरूम, घर, बंगले, फार्म हाऊस, शेतजमीन, मर्सिडीज, फॉर्म्युनर, म्युचुअल फंडस्, एलआयसी, शेअर्स अशा मालमत्तेचा समावेश आहे.

अटक झालेल्या आरोपींच्या मालकीची मालमत्ता आढळून आल्यास त्याबाबतची माहिती पोलिसांना कळवावी, असे आवाहन ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी जनतेला केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: #Mumbai
First Published: Dec 13, 2019 08:14 PM IST

ताज्या बातम्या