मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, पाणी कपातीबाबत प्रशासनाने घेतला नवा निर्णय

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, पाणी कपातीबाबत प्रशासनाने घेतला नवा निर्णय

तलावांच्‍या पाणलोट क्षेत्रात गेल्‍या काही दिवसांत झालेल्‍या दमदार पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑगस्ट : बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांच्‍या पाणलोट क्षेत्रात गेल्‍या काही दिवसांत झालेल्‍या दमदार पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे. आज सकाळी 6 वाजता करण्‍यात आलेल्‍या मोजणीनुसार सातही तलावातील एकूण जलसाठा हा 95.19 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. ही बाब लक्षात घेऊन दिनांक 5 ऑगस्‍ट 2020 पासून लागू करण्‍यात आलेली पाणीकपात मागे घेण्‍याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

नव्या निर्णयानुसार दिनांक 29 ऑगस्‍ट 2020 पासून बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्राला नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्‍याचबरोबर बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केल्‍या जाणाऱ्या ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर संबंधित गावांचा पाणीपुरवठा नियमित करण्‍याचेही ठरवण्‍यात आले आहे, अशी माहिती बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या जल अभियंता खात्‍याद्वारे देण्‍यात आली आहे.

यंदाच्‍या पावसाळ्यादरम्‍यान जून व जुलै महिन्‍यात तलाव क्षेत्रात कमी प्रमाणात पाऊस झाला होता. परिणामी, जुलै अखेरीस तलावांमधील एकूण जलसाठा हा केवळ 34 टक्‍के उपलब्‍ध असल्‍याने बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिनांक‍ 5 ऑगस्‍ट 2020 पासून 20 टक्‍के पाणीकपात लागू केली होती. त्‍यानंतर तलाव क्षेत्रात झालेल्‍या दमदार पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन दिनांक 21 ऑगस्‍ट 2020 पासून पाणीकपात 20 टक्‍क्‍यांवरुन 10 टक्‍के करण्‍यात आली होती. त्‍यानंतर तलाव क्षेत्रात सातत्‍याने पावसाने हजेरी लावल्‍याने जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली.

यानुसार आज सकाळी सातही तलाव क्षेत्रात एकूण 13 लाख 77 हजार 690 दशलक्ष लिटर अर्थात 95.19 टक्‍के एवढा नोंदविण्‍यात आला आहे. आजच्‍याच दिवशी गेल्‍यावर्षी म्‍हणजेच 28 ऑगस्‍ट 2019 रोजी तलाव क्षेत्रातील एकूण पाणीसाठा हा 96.43 टक्‍के इतका होता. तर 28 ऑगस्‍ट 2018 रोजी एकूण जलसाठा हा 94.89 टक्‍के इतका होता.

Published by: Akshay Shitole
First published: August 28, 2020, 3:54 PM IST

ताज्या बातम्या