मंत्रालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, सहाव्या मजल्यावरून मारली उडी!

मंत्रालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, सहाव्या मजल्यावरून मारली उडी!

मंत्रालयामध्ये पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न करण्याची घटना घडली आहे. मंत्रालयात सहाव्या मजल्यावरून एका महिलेनं उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर :: मंत्रालयामध्ये पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न करण्याची घटना घडली आहे. मंत्रालयात सहाव्या मजल्यावरून एका महिलेनं उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने सुरक्षा जाळी लावल्यामुळे या महिलेचा जीव वाचला.

प्रियांका गुप्ता असं या महिलेचं नाव असल्याची माहिती समोर आली. या महिलेचा पती  गेले काही वर्षे सतत आजारी आहे. त्यांच्या उपचारांचा खर्च हाता बाहेर गेल्यामुळे तिने मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र, त्यात सतत दिरंगाई होत असल्यामुळे तिने आज मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर सुरक्षा जाळी बसवण्यात आल्यामुळे तिचा जीव वाचला. ती या सुरक्षा जाळीमध्ये अडकल्यावर तिला मंत्रालयातील पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढलं. प्रियांका गुप्ताला मोठा मानसिक धक्का बसला असून तिच्यावर अधिक उपचार करण्यासाठी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

उल्हासनगर येथील ही महिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून मंत्रालयात तैनात पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे. सध्या महिलेला मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील पोलिसांनी या महिलेला सेंट जॉर्ज रुग्णालयात  नेण्यात आले आहे. ही महिला काही कामानिमित्त मंत्रालयात गेले अनेक दिवस येत होती. त्यामुळे त्रस्त होऊन तिने आत्महत्येचा प्रयत्न केला अशी पोलीस सूत्रांनी माहिती दिली.

याआधी देखील अनेकदा मंत्रालयात असं आत्महत्येचे प्रयत्न केलेल्या घटना घडल्या. मात्र, सरंक्षण जाळीमुळे त्यांचे देखील प्राण वाचले होते.आज घडलेल्या या घटनेबाबत अधिक माहिती मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृत्युंजय हिरेमठ आणि पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांना विचारले असता, नेमकं या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न का केला याची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांच्या सूत्रांनुसार, प्रियंका गुप्ता ही उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोलिसांना मारहाण प्रकरण आणि मध्यरात्री उशिरा पर्यंत ज्यूस सेंटर सुरू ठेवत असल्यानं पोलिसांनी कारवाई केली होती.

नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिली घटना

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकासआघाडी स्थापन केलं. नव्या सरकारच्या कारभाराला सुरुवात झाल्यानंतर काही दिवस लोटले नाही तेच आत्महत्येचा प्रयत्न करण्याची ही पहिली घटना घडली. याआधीही फडणवीस आणि आघाडी सरकारच्या काळात मंत्रालयात आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या होत्या. फेब्रुवारी 2018 मध्ये धुळ्यातील 80 वर्षांचे शेतकरी धर्मा पाटील यांनी विष प्राशन करून मंत्रालयात आत्महत्या केली होती. या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले होते. या प्रकरणानंतर मंत्रालयात आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी सुरक्षा जाळी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, तरीही आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटना कमी झाल्या नाही. मात्र, सुरक्षा जाळीमुळे आत्महत्या करण्याचे प्राण वाचले.

Published by: sachin Salve
First published: December 13, 2019, 5:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading