Home /News /mumbai /

मुंबई क्राईम ब्रँचला मोठं यश, कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाच्या अखेर मुसक्या आवळल्या!

मुंबई क्राईम ब्रँचला मोठं यश, कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाच्या अखेर मुसक्या आवळल्या!

मुंबईत खंडणीचे रॅकेट चालवणारा कुख्यात गँगस्टर आणि अंडवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा माजी हस्तक एजाज लकडावाला याच्या अखेर मुंबई क्राईम ब्रँचने मुसक्या आवळल्या आहेत

    मुंबई, 9 जानेवारी: मुंबईत खंडणीचे रॅकेट चालवणारा कुख्यात गँगस्टर आणि अंडवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा माजी हस्तक एजाज लकडावाला याच्या अखेर मुंबई क्राईम ब्रँचने मुसक्या आवळल्या आहेत. बिहारमधील पाटणा येथे मुंबई क्राईम ब्रँचच्या खंडणी विरोधी पथकाने एजाज लकडावाला याच्या हातात बेड्या ठोकल्या. एजाज त्याला कोर्टात हजर केले असता त्याची 21 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अखेर खुद्द एजाज लकडावालाला पोलिसांनी अटक केल्यामुळे हे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना मोठं यश आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, 10 दिवसांपूर्वीच म्हणजे 29 डिसेंबर रोजी एजाज याची मुलगी सोनिया शेख हिला पोलिसांनी विमानतळावरून अटक केली होती. आपल्या मुलीसोबत ती भारत सोडून नेपाळला पळून जात असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी सांगितले की, एजाजची मुलगी आधीपासून आमच्या ताब्यात आहे. तिने आम्हाला खूप सारी माहिती पुरवली. एजाज पाटण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर आम्ही सापळा रचून एजाजला पाटण्यातल्या जत्तनपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अटक केली आहे. दाऊदचे म्होरकेही होते मागावर.. भारतात मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक असलेला एजाज लकडावाला अंडवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा माजी हस्तक होता. त्याच्याविरोधात खंडणी, हत्या आणि असेच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दाऊदच्या टोळीतून बाहेर पडल्यानंतर दाऊदचे म्होरकेही त्याच्या मागावर होते. 2003 मध्ये दाऊदच्या सहकाऱ्यांनी एका बॉम्बस्फोटात त्याला ठार मारण्याचा कट रचला होता. मात्र, तो या हल्ल्यातून बचावला होता. नंतर तो कॅनडामधून आपले खंडणीचे उद्योग करत होता. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एजाजविरुद्ध 27 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 25 एकट्या मुंबईतील आहेत. या प्रकरणीच लकडावालाची सध्या कसून चौकशी केली जात आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या