मुंबई,22 नोव्हेंबर: लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला कानपूर (उत्तर प्रदेश) येथील असून ती रेल्वे एक्स्प्रेसने मुंबईत आली होती. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी दोन नराधमांना ताब्यात घेतले आहे. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, मुंबईसह उपनगरात बलात्कार, विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
मुंबई मुली आणि महिलांसाठी असुरक्षितच...
देशातील सर्वाधिक सुरक्षित शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. परंतु आता हेच शहर मुली-महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक बनल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मुंबईत 2018-19 या वर्षात बलात्काराच्या घटनांमध्ये 22 तर विनयभंगाच्या घटनांमध्ये तब्बल 51 टक्के वाढ झाल्याचे 'प्रजा फाऊंडेशन'या संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे. बलात्कारपीडितांमध्ये 69 टक्के अल्पवयीन मुली आहेत. धक्कादायक म्हणजे महिलांवर अत्याचार करणारे 90 टक्के आरोपी हे ओळखीचेच असल्याची माहिती समोर आली आहे.
चोरी, घरफोडीत घट तर अत्याचारांमध्ये वाढ..
'प्रजा फाऊंडेशन'ने मुंबईतील एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीमधील गुन्ह्यांची आकडेवारीचा तपशील जाहीर केला आहे. चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये घट तर महिलावरील अत्याचारांच्या घटनामध्ये वाढ झाल्याचे दिसून या तपशीलातून समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुले आणि मुली नराधमांचे बळी ठरण्याचे प्रमाण अधिक आहे. गुन्ह्यांचा तपास करणासाठी मुंबई पोलिस दलात सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांची संख्या अत्यल्प असल्याचेही 'प्रजा फाऊंडेशन'च्या अहवालात समोर आले आहे. मुंबईत घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत विधिमंडळात आवाज उठवण्यात लोकप्रतिनिधी कमी पडल्याचे समोर आले आहे. सन 2018-19 मध्ये अल्पवयीन मुलींवरील वाढत्या गुन्ह्यांबाबत लोकप्रतिनिधींनी केवळ दोनच प्रश्न उपस्थित केले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा