Home /News /mumbai /

‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : आठ क्विंटल सुका मेवा, दोन लाख नारळ, ‘GSB’चा श्रीमंत उत्सव!

‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : आठ क्विंटल सुका मेवा, दोन लाख नारळ, ‘GSB’चा श्रीमंत उत्सव!

कोल्हापूरातल्या महापूराच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव हा पारंपरिक पद्धतीने साजरा होणार असून मंडळ पूरग्रस्तांसाठी मदतही करणार आहे.

मुंबई, 29 ऑगस्ट: दोन लाख नारळ, एक क्विंटल सुवासिक फुलं, दीड लाख सफरचंद, दीड लाख डाळींब, 8 क्विंटल सुकामेवा, 12 क्लिंटल गुळ, काही क्विंटल शुद्ध तूप, 80 हजार स्क्वेअर फुटांचा भव्य मंडप, दररोज 15 हजार भाविकांना फलाहार आणि 15 हजार भाविकांना दुपारचं जेवण. 65 किलो सोनं आणि 350 किलो चांदिचे दागिने. हे वाचून तुम्हाला दक्षिणेतल्या एखाद्या मोठ्या मंदिरातल्या उत्सवाची ही सगळी तयारी आहे असं वाटेल. मात्र अशी सगळी जय्यत तयारी सुरू आहे ती ‘जीएसबी’ गणपतीच्या पाच दिवसांच्या महाउत्सवाची. मात्र कोल्हापूरातल्या महापूराच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव हा पारंपरिक पद्धतीने साजरा होणार असून मंडळ पूरग्रस्तांसाठी मदतही करणार आहे. मुंबईच्या गणेशोत्सवात सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र असलेला गणपती म्हणजे गौड सारस्वत ब्राम्हण सेवा मंडळ म्हणजेच ‘जीएसबी गणपती’. GSBचं नाव घेतलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर येते ती बाप्पांची अलंकारांनी सजलेली आखीव रेखीव भव्य मूर्ती. बाप्पांच्या अंगावरचे दागिने पाहिले म्हणजे भाविकांचे डोळे दिपून जातात. गेली सहा दशकं याच भव्यपणे GSB गणेशोत्सव साजरा करतंय. ‘नेटकं’ काम आणि नेमकं ‘नियोजन’ GSB सेवा मंडळाचं सर्वच काम अत्यंत नेटकं, काटेकोर आणि आखीव रेखीव. सर्व कामांच डिजिटलायझेशन झाल्यानं कामं वेळेत आणि नमकेपणानं होतात. मंडळाच्या कामाचा हा व्याप पाहिला तरी थक्क व्हायला होतं. मात्र योग्य व्यवस्थापनाच्या बळावर आम्ही हा उत्सव यशस्वीपणे पार पाडतो असं मंडळाचे विश्वस्त आर. जी. भट यांनी सांगतलं. काही दिवसांवर आलेला गणेशोत्सव, कामाची भली मोठी यादी, प्रत्येक गोष्ट उत्कृष्टच झाली पाहिजे यावर असलेला भर असं असतानाही भट यांच्या बोलण्यात कुठेही दडपण जाणवत नव्हतं की ताण. ते म्हणाले, दडपण जाणवत नाही कारण आम्ही कामाची वाटणीच अशी करतो की कामं विभागली जातात आणि नेमून दिलेलं काम प्रत्येक जण चोखपणे पार पाडतो. त्यामुळं आम्हाला कधीच अडचण येत नाही. काम नाही तर सेवा करणारे समर्पित कार्यकर्ते असल्यावर काळजी करण्याचं काहीच कारण नाही असं सांगत आर.जी.भट यांनी कार्यकर्त्यांवर असलेला विश्वासही व्यक्त केला. दोन महिने आधीपासून सुरू होते ‘महा’तयारी GSBमंडळाचा गणेशोत्सव हा देखाव्यासाठी नाही तर पारंपरिक पूजा आणि फुलांच्या सजावटीसाठी ओळखला जातो. याची तयारी सुरू होते ती दोन महिने आधीपासून. मंडळाच्या कार्यकारी मंडळाची दोन महिने आधी बैठक होते आणि गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला जातो. सगळी कामं ठरलेली असल्यानं नवं काय करायचं याचा आढावा घेऊन उत्सवाचं नियोजन केलं जातं. ही कामं करण्यासाठी मंडळानं 44 उपसमीत्या तयार केल्या आहेत. प्रत्येक समितीला कामांची यादी दिली जाते आणि ती समिती ती कामं चोखपणे पार पाडते. डोळे दिपवणारे अलंकार GSB गणपतीला असलेले अलंकार पाहिले तरी सामान्यांचे डोळे दिपून जातील. बाप्पांचं पोट वगळलं तर मूर्तीचं सर्व अंग सुंदर आणि आकर्षक अलंकारांनी मढवलेलं असतं. एकून 65 किलो सोनं आणि 350 किलो चांदीचे दागिने बाप्पांना आहेत. यात सर्वात आकर्षक आहे तो बाप्पांचा 22 किलो सोन्याचा माणिक आणि पाचूंनी मढवलेला मुकूट. सोन्याचे हात, मुकूट, सुवर्ण जडीत कान आणि कुंडलं, सोन्याचं जानवं, हातातले आयुधं आणि पवित्र चिन्हं, चांदीचा उंदीर आणि सोने-चांदीचा वापर करून बनवलेली सुंदर प्रभावळ. हे सर्व दागिने वर्षभर बँकेच्या तिजोरीत ठेवले जातात आणि गणेशोत्सवाच्या काळात बाहेर काढले जातात. मंडळ दरवर्षी या दागिन्यांचा काही कोटींचा विमा उतरवते आणि त्या विम्याचा आकडाही बातमीचा विषय बनतो. यावर्षी त्यांनी 266 कोटी 55 लाखांचा विमा काढलाय. विविध पूजांनी बाप्पांची आराधना GSB मंडळाच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे दिवसभर चालणाऱ्या विविध पूजा. यातली प्रत्येक पूजा शास्त्रोक्त पद्धतीनेच केली जाते. सकाळी साडेपाच वाजता आवाहन आणि गण होमाने पूजेची सुरूवात होते. नंतर तुला सेवा, सकाळचा खास प्रसाद, माध्यान्ह पूजा, माध्यान्ह आरती, मुढ गणपती पूजा, महामूढ गणपती पूजा केली जाते. या पूजेच्या वेळी दररोज एक हजार नारळं फोडली जातात. नंतर प्रसादामध्ये त्याचा वापर केला जातो. नंतर दीप पूजा, रंग पूजा, पुष्प पूजा आणि रात्री शेजारती असा दररोज भरगच्च कार्यक्रम असतो. यातल्या प्रत्येक पूजेसाठी भाविक आपल्या नावांची नोंदणी करतात. मागच्यावर्षी अशा प्रकारच्या तब्बल 60 हजार पूजा संपन्न झाल्या. यावर्षी हा आकडा आणखी वाढणार आहे. अन्न दान,पवित्र दान GSB मंडळाचं सर्वच काम भव्य-दिव्य करण्याचा प्रयत्न असतो. सकाळी दर्शनाला येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून मंडळाकडून फलाहार देण्यात येतो. तर दुपारी जेवण असतं. दररोज 15 हजार भाविकांना नाश्ता तर तेवढ्याच भाविकांना जेवण देण्यात येतं. गणेश स्थापनेपासून ते विसर्जनाच्या पाचव्या दिवसांपर्यंत हे अन्नदान सुरू असतं. जेवणात आणि इतर गोष्टींसाठी शुद्ध तुपाचाच वापर केला जातो. हिमाचलप्रदेशातून सफरचंद, पश्चिम महाराष्ट्रातून डाळींब, कोल्हापूरातून गुळ, केरळमधून नारळं, कोकणातून सुका मेवा आणि बंगळूरातून सुवासिक फुलं असं साहित्य त्या त्या भागातून मागवलं जातं. त्यासाठी कुठलाही हात आखडता घेतला जात नाही. ‘हाय टेक’ मंडळ GSB गणपती आपल्या पारंपरिक पद्धतीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध असला तरी मंडळाचे सर्व कामकाज आणि कायकर्ते हायटेक आहे. मंडळाचं सर्व कामकाज डिजिटलाईज झालंय त्यामुळं प्रत्येकाच्या कामाचा ट्रॅक राहते आणि कामं वेळेवर होण्याकडे लक्ष दिलं जातं. मंडळाचा सर्व हिशेबही चोख ठेवला जातो. सर्व व्यवहार हे चेकने होत असल्यामुळे सर्व गोष्टी एका ‘क्लिक’वर उपलब्ध होतात. आम्ही थकतो, बाप्पा नाही मंडळाला मिळणाऱ्या देणगींबाबतही त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले GSBमंडळाकडे दानशूर भाविकांची कमतरता नाही. उत्सवासाठी देणगी देणाऱ्या 60 हजार लोकांची नावं मंडळाकडे आहेत. यात दरवर्षी भर पडत असते. एखाद्या वर्षी कुणाकडे जाणं झालं नाही तर भाविक का आला नाहीत अशी विचारणा मंडळाकडे करतात आणि देणगी स्वत: आणून देतात. त्यामुळं मंडळाच्या कार्यकर्त्यांना दरवर्षी या प्रत्येकाकडे जावचं लागते अशी आठवणही त्यांनी सांगितली. या कामांमुळे कार्यकर्ते थकतात, मात्र देणाऱ्यांचा ओघ थांबत नाही. ही बाप्पांची कृपा आहे. मंडळात काम करणारा प्रत्येक जण आपली नोकरी आणि व्यवसाय सांभाळून मंडळाच्या कामात आपलं योगदान देत असतो. हीच खरी गणेशाची सेवा आहे. गणेशोत्सवच्या काळात उत्सवाचं नियोजन करतानाच तरूण कार्यकर्ते हे आपल्या आयुष्याचं नियोजन करण्याचंही आव्हान पेलत असतात. गणेशोत्सवाचं हेच खरं यश आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Ganesh Chaturthi, Ganesh Chaturthi 2019, Ganeshotsav management, Mumbai

पुढील बातम्या