मानखुर्द, 12 डिसेंबर : जास्त दारू पाजली नाही म्हणून मित्रांनी मित्राची हत्या केल्याची घटना मानखुर्दमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. सुरुवातीला राजू गायकवाड या मृत युवकाने वाशी पुलावरून खाडीत उडी मारल्याचं सांगण्यात आलं होतं. पण पोलिसांच्या तपासात मित्रांनीच राजूला खाडीत ढकलल्याचं समोर आलं. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तिघांना अटक करण्यात आली.
गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा राजू गायकवाडने वाशी पुलावरून खाडीत उडी मारली असं त्याच्या मित्रांनी राजू गायकवाडच्या घरी कळवलं आणि त्यांनी तशी तक्रारच पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवर वाशी पोलीस ठाणे आणि मुंबईतील गोवंडी पोलिसांनी वाशी आणि आजूबाजूच्या समुद्र किनारी शोध घेतला मात्र राजू किंवा त्याचा मृतदेह सापडला नाही.
मात्र घडलेल्या घटनेबाबत राजूच्या घरच्यांना आणि पोलिसांना त्याच्या मित्रांवर संशय निर्माण झाला. ते काही तरी लपवत असल्याचं त्यांच्या बोलण्यात आढळून आलं आणि तो संशय खरा ठरला. राजू याने स्वतः उडी मारली नव्हती तर त्याच्या सोबतच्या मित्रांनी राजूला खाडीत ढकल्याचं निष्पन्न झालं.
या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह अविनाश ढिलपे आणि कृष्णा सुतार यांना राजू गायकवाड च्या हत्येच्या गुन्ह्यात अटक केली तर राजू गायकवाड चा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मुंबई इथं येलो गेट परिसरात सापडला.
काय घडलं नेमकं?
राजू आणि त्याचे 3 मित्र गोवंडी इथं दारू प्यायला बसले होते. मित्रांनी राजूला अजून दारूची मागणी केली. पण राजूने नकार दिला. त्यामुळे तिघांनी राजूला मारहाण केली आणि तिघांना मधील एकानं राजूंच्या कानशिलात लगावली त्यात त्याची कानातील सोन्याची रिंग खाली पडली. यावर राजू ने मी पोलिसात तक्रार करणार अशी धमकी दिल्यावर ह्या तिघांनी दारूच्या नशेत असलेल्या राजूला दुचाकीवरून वाशी पुलावर नेलं आणि तेथून त्याला ढकलून दिलं ढकलून देण्याआधी त्याच्या गळ्यातील सोन साखळी ही काढून घेतली.
एक मित्र दुसऱ्या मित्रासाठी आपल्या प्राणाची आहुती ही देतो मात्र व्यसनाच्या आधीन झालेल्या या तिघांनी राजूची हत्या तर केली आणि मैत्रीचा निर्घृणपणे खून ही केला.
=================================================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा