मुंबई, 2 जुलै : राज्यातील महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर हे सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार सत्तेवर आले आहे. ठाकरे सरकारमधील महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ठाकूर यांनी सर्व स्टाफचा भावुक निरोप घेतलेला हा व्हिडीओ आहे.
मुंबईतील मंत्रालयातील स्टाफचा त्यांनी निरोप घेतला. यावेळी त्यांनी शिपाई, सुरक्षा रक्षक, कार्यालयीन कर्मचारी तसंच सचिव या सर्वांचं स्वत: औक्षण केलं, तसंच त्यांना शाल पांघरत त्यांचा सत्कार केला. आता मंत्री म्हणून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी नातं राहिलं नसलं तरी ऋणानुबंध आयुष्यभर राहतील अशी भावना ठाकूर यांनी व्यक्त केली.
यशोमती ठाकूर यांनी फेसबुक पोस्टसह हा व्हिडीओ शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'आपण सर्वांनी गेले अडीच वर्ष दिलेली साथ मोलाची आहे. आपण सर्वांनीच सामान्यांना दिलासा देणारे निर्णय केले, जनतेच्या भल्याची कामे केली. आता अधिकारी, कर्मचारी असे नाते राहिले नाही तरी आपले ऋणानुबंध आयुष्यभराचे असणार आहेत. मी कायम तुमच्या सोबत असेन' असे ठाकूर यांनी सांगितले.
'मराठा म्हणून एकनाथ शिंदे..'; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत ज्योतिरादित्य शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
यशोमती ठाकूर यांना काँग्रेसच्या कोट्यातून महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले होते. त्या मावळत्या सरकारमध्ये अमरावतीच्या पालकमंत्री होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.