मुंबई, 12 नोव्हेंबर : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत ईडीची (ED) कारवाई आणि भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. काल वक्फ बोर्डाच्या जमीन व्यवहारांच्या संबंधित प्रकरणी ईडीने छापेमारी केल्याची माहिती समोर आली होती. यावर भाष्य करताना नवाब मलिकांनी ईडी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
नवाब मलिकांनी म्हटलं, काल दुपारपासून ईडीच्या माध्यमातून बातम्या पेरण्याची सुरुवात झाली की, आता वक्फ बोर्डाच्या प्रकरणात ईडीने छापेमारी केलेली आहे. नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ होणार, नवाब मलिक गोत्यात येणार याप्रकारे बातम्या पेरण्यात आल्या आहेत. मी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगतो की, तुमचे जे कोणी आका असतील त्यांना खूश करण्यासाठी अशा बातम्या पेरू नका. पत्रकार परिषद घ्या किंवा प्रेस नोटच्या माध्यमातून जे काही सत्य आहे ते जाहीर करा.
पुण्यात ज्या प्रकरणात ईडीने पुण्यात कारवाई केली. पुणे एमआयडीसीने भूसंपादन करुन भूसंपादन अधिकाऱ्यांकडे पैसे दिले. खोटे कागदपत्रे तयार करुन लोकांनी सरकारी कार्यालयातून पैसे घेतले होते. त्या प्रकरणाची बोर्डाला माहिती होताच बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पाच जणांना अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. ईडी जर आम्हाला क्लीन अपसाठी मदत करत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो.
वाचा : ईडीकडून पुणे, औरंगाबादमध्ये 7 जागांवर छापेमारी
माजी मंत्र्याने जमीन हडपली, लवकरच भांडाफोड करणार
आम्ही सात प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. वक्फ बोर्डाने क्लीन अप मोहीम महाराष्ट्रात सुरू केलीय. भाजप म्हणतय की, नवाब मलिकांचा वक्फ बोर्डाचा घोटाळा बाहेर काढणार. आम्ही तर म्हणतोय क्लीन अप ड्राईव्ह सुरू होऊद्या. मग मंदिर, मशिद, दर्गाच्या जमीन हडप करण्याचं काम या महाराष्ट्रात केलं आहे. भाजपच्या एका माजी मंत्र्याने शेकडो जमीन मंदिराची हडप केली आहे. महाराष्ट्रात ज्यांनी-ज्यांनी अशा प्रकारची लुट केली आहे त्या सर्वांवर कारवाई व्हाययला हवी. मंदिराची जमीन माजी मंत्र्याने कशी हडप केली आणि कशा प्रकारे शेकडो कोटी रुपये खाल्ले त्याचाही भांडाफोड लवकरच करणार आहे. मी सांगू इच्छितो की, अशा प्रकारच्या कारवाईंना नवाब मलिक घाबरणार नाहीये.
नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
कालपासून अफवा पसरवण्याचं काम सुरू
नवाब मलिक कोणत्याही कारवाईला घाबरणार नाही
ईडीच्या अधिकाऱ्यांनी अफवा पसरवू नये
'मालका'ला खूश करण्याचा ईडीचा प्रयत्न सुरू आहे
भाजपच्या माजी मंत्र्यानं मंदिराच्या नावाखाली मोठी जमीन हडपली, नवाब मलिकांचा आरोप
वक्फ बोर्डात स्वच्छता मोहीम आम्ही सुरू केलीय
मंदिरे, मस्जिद, दर्गांच्या जमीन हडपण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडले आहेत
अशा प्रकारे जमीन हडप करणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, ED, Nawab malik