मुंबई, 8 डिसेंबर : मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayou Kishori Pednekar) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत आता पुन्हा भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे. किशोरी पेडणेकर यांनी स्वत: मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात शेलारांविरोधात तक्रार केलीय. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कलम 354 अंतर्गत शेलारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलीस कधीही आशिष शेलार यांना अटक करण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. याप्रकरणात जामीन मिळावा यासाठी शेलार यांना थेट कोर्टातच जावं लागेल.
काही दिवसांपूर्वी भाजप नेते नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता किशोरी पेडणेकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा भाजपला दुसरा धक्का असल्याचं मानलं जात आहे. आशिष शेलार यांना पोलिसांनी अटक केल्यास मुंबई महापालिका निवडणुकीच्याआधीच मुंबईत भाजप-शिवसेना यांच्यातील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपकडून शेलार यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
हेही वाचा : बिपीन रावत यांच्या निधनावर बॉलिवूडमधून हळहळ, कबीर बेदी म्हणाले....
किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेल्या टीकेप्रकरणी शिवसेनेकडून भाजपवर वारंवार प्रत्युत्तर देण्यात आलंय. तसेच पडद्यामागे प्रचंड वेगाने घडामोडी घडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आशिष शेलार यांना पोलिसांनी अटक केली तर भाजप-शिवसेना यांच्यातील संघर्षाला पुन्हा एकदा ठिणगी पडणार आहे.
महिलेविषयी कुणीही आक्षेपार्ह वक्तव्य करु नये. तशाप्रकारची हिंमत करु नये आणि धजावू सुद्धा नये अशा आक्रमक पद्धतीने मत मांडत किशोरी पेडणेकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. कोणत्याही परिस्थितीत गुन्हा दाखल व्हावा, या मागणीवर त्या ठाम होत्या. अखेर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ज्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो लैंगिक छळ या दोन शब्दांमध्ये फिरणारा आहे. याचबरोबर कलम 509 या अंतर्गत विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कलम 354 हे कोर्ट बेलेबल आहे. तसेच मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अत्यंत वेगाने हालचाली घडत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.