अखेर 47 दिवसांनंतर आझाद मैदानावरील मराठा तरुणांचे आंदोलन मागे

अखेर 47 दिवसांनंतर आझाद मैदानावरील मराठा तरुणांचे आंदोलन मागे

मराठा उमेदवारांना नियुक्ती मिळावी म्हणून गेल्या 47 दिवसांपासून मराठा समाजातील तरुण आझाद मैदानात आंदोलन करत होते.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च : मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या 47 दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या मराठा समाजातील तरुणांनी आपलं आंदोलन अखेर मागे घेतलं आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.

मराठा उमेदवारांना नियुक्ती मिळावी म्हणून गेल्या 47 दिवसांपासून मराठा समाजातील तरुण आझाद मैदानात आंदोलन करत होते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानात जाऊन मराठा तरुणांचं आंदोलन सोडवलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं.

'महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62/20018 मधील कलम 18 नुसार मराठा उमेदवारांना नियुक्ती मिळावी, म्हणून गेल्या 47 दिवसांपासून मराठा समाजातील तरुण आझाद मैदानात आंदोलन करत होते. आज या मागण्यांबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, आमदार भरत गोगावले आणि विनायक मेटे यांनी आझाद मैदानात जाऊन आंदोलक तरुणांची भेट घेतली. आणि आंदोलन मागे घेण्याच आवाहन केलं. त्यानंतर मराठा आंदोलक तरुणांनी आझाद मैदान गेले 47 दिवस सुरू असलेलं आंदोलन मागे घेतलं.' अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी या पत्रकात दिली.

मराठा समाजातील तरुणांच्या नियुक्त्यांसंदर्भात लवकरच बैठक - मुख्यमंत्री

सन 2014 च्या आरक्षणानुसार निवड झालेल्या मराठा समाजातील तरुणांच्या नियुक्त्यांसंदर्भात लवकरच एक बैठक घेण्यात येईल. या बैठकीसाठी सर्वपक्षीय नेते, कायदेतज्ज्ञ यांना बोलावण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत सांगितलं.

विनायक मेटे यांनी विधानपरिषदेत सन 2014 च्या आरक्षणानुसार निवड झालेल्या मराठा समाजातील तरुणांच्या नियुक्त्यांसंदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत सन 2014 च्या आरक्षणानुसार निवड झालेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांना नियुक्त्या देता येणार नाही. यासंदर्भात कायदेशीर बाजू भक्कम करण्यासाठी सर्वपक्षीय नेते, कायदेतज्ज्ञ, आझाद मैदानात उपोषण करीत असलेले तरुणांची बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. मराठा समाजातील तरुणांच्या नियुक्त्यांसदर्भात आणि सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची कायदेशीर बाजू भक्कमपणे मांडण्यात येईल. याप्रकरणी कायदेशीर अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. आझाद मैदानात उपोषण करीत असलेल्या मराठा समाजातील तरुणांनी आपले उपोषण मागे घ्यावं, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. अखेर मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर मराठा समाजातील तरुणांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.

First published: March 14, 2020, 5:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या