Home /News /mumbai /

ठाकरे सरकारवर 302 कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, भाजपची आक्रमक मागणी

ठाकरे सरकारवर 302 कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, भाजपची आक्रमक मागणी

'एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या ठाकरे सरकारवर 302 कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.'

    मुंबई, 9 नोव्हेंबर : 'एसटी कर्मचाऱ्यांना गेले तीन महिने पगार न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. पगार मिळत नसल्यामुळे गेल्या दोन दिवसात एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तरीही हे ठाकरे सरकार अजूनही झोपले आहे. त्यामुळे या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या ठाकरे सरकारवर 302 कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,' अशी आग्रही मागणी भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आजच एका महिन्याचे पगार देण्याची केलेली घोषणा म्हणजे तात्पुरती मलपटटी करण्याचा प्रयत्न आहे. एसटी कर्मचा-यांना सरकारकडून अर्धवट न्याय मिळाला आहे, पण जोपर्यंत कर्मचाऱ्यांना पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरुच राहणार असल्याचंही दरेकर यांनी म्हटलं आहे. 'कर्मचाऱ्यांच्या चिठ्ठीत ठाकरे सरकारचे नाव' 'वेतन न दिल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. काल जळगाव येथे मनोज चौधरी व आज रत्नागिरीत पांडुरंग गडदे या एसटी चालकाने गळफास लावून आत्महत्या केली. या दोन्ही घटना या सरकारला शोभा देणाऱ्या नाहीत, तसेच मनोज चौधरी यांनी आत्महत्या करताना चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये एसटीच्या व्यवस्थेवर आरोप केलाय व या अव्यवस्थेला एसटी महामंडळ व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे नमूद केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या चिठ्ठीत ठाकरे सरकारचे नाव आहे. त्यामुळे जर अर्णब गोस्वामी यांचे नाव अन्वय नाईक प्रकरणात आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. मग आता ठाकरे सरकारमध्ये कोणावर गुन्हा दाखल करणार,' असा तिखट सवालही दरेकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या ठाकरे सरकारविरुध्द भारतीय दंड संहिता 302 कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Pravin darekar, Uddhav thackeray

    पुढील बातम्या