मुंबई 16 मे : देशभरात कोरोनानं (Coronavirus) अक्षरशः थैमान घातलं आहे. राज्यातही कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. कोरोनाच्या महामारीत शासनाने लग्न समारंभासाठी (Marriage Functions) 50 जणांची मर्यादा दिली आहे. मात्र, अनेकजण सर्रास हे नियम पायदळी तुडवत असल्याचं चित्र आहे. विरारमधूनही (Virar) अशीच एक बातमी समोर आली आहे. नियम धाब्यावर (Violation of Covid Rules) बसवून विरार जवळच्या सकवार गावात तांबडी कुटुंबामध्ये रविवारी लग्न सोहळा पार पडणार होता. मात्र लग्नाच्या पूर्वसंध्येलाच तूफ़ान राडा झाला आणि सगळे झिंगझिंग झिंगाट होऊन एकमेकांना भिडल्याचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.
सुनील तांबोळी यांचा विवाह रविवारी पार पाडणार होता आणि त्यांच्या लग्नाच्या एक दिवस आधी हा राडा झालेला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की या कार्यक्रमात प्रचंड गर्दी झाली आहे. केवळ गर्दीच नाही तर नंतर यात सहभागी झालेले तरुण एकमेकांना अक्षरशः चोपताना दिसत आहे. लग्नातील हाणामारीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष बाब म्हणजे या गावातील सरपंच नवऱ्या मुलाच्या शेजारीच राहातात. मात्र, त्यांचं याकडे दुर्लक्ष कसं झालं? इथे जमलेली गर्दी त्यांनी पाहिली नाही का? या लोकांविरोधात विरार पोलीस कारवाई करणार का ? असे सवाल उपस्थित होत आहेत.
विरारमध्ये लग्न समारंभादरम्यान फ्रिस्टाईल हाणामारी; पाहुण्यांनी एकमेकांना धू धू धुतलं pic.twitter.com/l7lT3af2b7
— News18Lokmat (@News18lokmat) May 16, 2021
या समारंभातील लोकांना कदाचित कोरोनाचाच विसर पडला असावा, असं व्हिडिओ पाहातान वाटतं. मात्र, जर अशाच प्रकारे लग्न समारंभ होत राहिले आणि अशी गर्दी होत राहिली तर कोरोना कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. सकवार गावातील ही पहिलीच घटना नाही. मागील महिनाभरापासून इकडे अशाच प्रकारे लग्नाचा धुमाकूळ सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणावर लग्नात गर्दी जमत आहे. इतकंच नाही तर कोरोना नियमही पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळे, अशा लोकांविरोधात कारवाई करणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.