Shocking : शेकडो रुग्णांना कोरोनातून वाचवणाऱ्या डॉक्टर पिता-पुत्राचा कोरोनानेच अंत

Shocking : शेकडो रुग्णांना कोरोनातून वाचवणाऱ्या डॉक्टर पिता-पुत्राचा कोरोनानेच अंत

वाईट बाब म्हणजे नागेंद्र यांचा वाढदिवस होता त्याच दिवशी त्यांचं निधन झालं. तर नोव्हेंबर महिन्यातच सूरज यांचं लग्न झालं होतं. त्यामुळं या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.

  • Share this:

कल्याण, 17 एप्रिल : कल्याणमध्ये मनाला चटका लावून जाणारी अशी एक घटना घडली आहे. कोरोनाचे संकट समोर आल्यापासून अनेक रुग्णांचे जीव वाचवणाऱ्या दोन डॉक्टरांचाच कोरोनामुळं अंत झाला. विशेष म्हणजे एकापाठोपाठ काही तासांच्या अंतरानं या डॉक्टर पितापुत्रांचा मृत्यू झाला. डॉ. नागेंद्र मिश्रा आणि त्यांचा मुलगा डॉ. सूरज मिश्रा असं या दोघांचं नाव आहे. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

डॉ. नागेंद्र मिश्रा यांचं टिटवाळामधील खडवली परिसरात सुमारे 22 वर्षांपासून क्लिनिक आहे. त्यांनी या माध्यमातून दोन दशकांहून अधिक काळ रुग्णसेवा केली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या संकटाला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी अनेक रुग्णांना या संकटातूनही बाहेर काढलं. अनेक गरीब कोरोना रुग्णांना त्यांनी जीवदान दिलं. नागेंद्र मिश्रा यांच्याप्रमाणेच त्याला छोटा मुलगा सूरज मिश्रा यांनंही रुग्णसेवेचं व्रत घेतलं होतं. भिवंडीच्या बापगाव भागात त्यांचं क्लिनिक होतं. तेही गरीब रुग्णांची सेवा करत होते. कोरोना काळात त्यांनी अनेक प्रकारे लोकांना मदत केली.

(वाचा-राजेश टोपेंनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्या 'या' 3 मागण्या)

मोफत उपचाराबरोबरच इतर प्रकारेही त्यांनी गरजुंना मदत केली. पण हे सर्व करत असतानाच त्यांनाही कोरोनाच्या या राक्षसानं गाठलं. काही दिवसांपूर्वी त्यांना ताप येऊ लागला. तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. मात्र नियतीचा खेळ म्हणजे अनेकांना कोरोनाच्या विळख्यातून सोडवणाऱ्या या देवदुतांनाच बेडसाठी वणवण करावी लागली. कल्याण डोंबिवलीत बेड मिळाला नाही म्हणून नागेंद्र यांना ठाण्यात वेदांत रुग्णालय आणि सूरज यांना गोरेगावमध्ये खासगी रुग्णालयात दाखल केलं. नागेंद्र यांच्या पत्नीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. त्यांना वसई विरारमधील रुग्णलयात दाखल करण्यात आलं. तर मोठा मुलगा आणि त्यांच्या पत्नी घरीच क्वारंटाईन होत्या. या दरम्यान डॉक्टर नागेंद्र आणि सूरज यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळं बुधवारी 15 एप्रिलला रात्री सूरज यांचं निधन झालं. तर नंतर काही तासांतच पहाटेच्या सुमारास डॉक्टर नागेंद्र यांनीही अखेरचा श्वास घेतला. एबीपी माझानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

(वाचा-कोरोना चाचणी न करता दारू पोहोचवू शकता बारचे कर्मचारी, पुण्यात नवा आदेश)

यातही आणखी वाईट बाब म्हणजे नागेंद्र यांचा वाढदिवस होता त्याच दिवशी त्यांचं निधन झालं. तर नोव्हेंबर महिन्यातच सूरज यांचं लग्न झालं होतं. त्यामुळं या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. नागेंद्र यांनी कोरोनाची लसही घेतली होती. पण दुसरा डोस घेण्याआधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकारानंतर संपूर्ण कल्याण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेत. पण कोरोना कुणालाही सोडत नाही. कोरोनाचे उपचार करणाऱ्या देवदुतांसारख्या डॉक्टरांनाही त्याचा घट्ट विळखा बसतोय. त्यामुळं त्यांच्यासाठी तरी सर्वांनी नियम पाळा, म्हणजे आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होईल.

Published by: News18 Desk
First published: April 17, 2021, 7:57 PM IST

ताज्या बातम्या