Home /News /mumbai /

अखेर 'त्या' 390 जणांना मिळणार खरी कोरोना लस, मुंबईत 9 बनावट लसीकरण प्रकरणं उघड

अखेर 'त्या' 390 जणांना मिळणार खरी कोरोना लस, मुंबईत 9 बनावट लसीकरण प्रकरणं उघड

मुंबईत आढळलेल्या 9 बनावट लस प्रकरणातील आतापर्यंत शोधलेल्या नागरिकांची यादी पोलिसांकडून महानगरपालिकेला प्राप्त झाली आहे.

    मुंबई, 23 जुलै : कोरोना लसीकरणाच्या नावाखाली कांदिवली (पश्चिम) मध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब (hiranandani estate society) या गृह संकुलात खासगी स्तरावर बनावट लसीकरण (Fake Vaccination Mumbai)  होऊन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अखेर या नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिका (mumbai municipal corporation) प्रशासनाकडून शनिवारी अधिकृत लस दिली जाणार आहे. कांदिवलीमध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलाने खासगीरित्या लसीकरण दिनांक 30 मे रोजी आयोजित केले होते. मात्र, सदर लसीकरण बनावट आणि अनधिकृत पद्धतीने झाल्याची बाब नंतर उघडकीस आली. त्याबाबत गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी चौकशी देखील सुरू केली. त्याचे धागेदोरे हाती लागल्यानंतर अशाच रितीने एकूण 9 बनावट व अनधिकृत लसीकरणाचे प्रकार घडल्याचे आणि त्यात अनेक नागरिकांना बनावट लस दिल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात हाती आली आहे. पतीचं अपहरण झाल्याच्या संशयाने पोलिसात केली तक्रार; धक्कादायक रॅकेटचा खुलासा सदर लाभार्थ्यांना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे तर, काहींची कोविन पोर्टलवर नोंद केल्याचे देखील निदर्शनास आले आहे. अनधिकृत आणि अनुचित पद्धतीने करण्यात आलेल्या या सर्व गोष्टींची पोलिसांनी सखोल चौकशी केली आहे. पोलीस तपासानुसार, ज्या नागरिकांना बनावट लस देण्यात आल्याचा संशय आहे, त्या नागरिकांची यादी पोलिसांनी महानगरपालिका प्रशासनाकडे सोपविली आहे. कोविन संकेत स्थळावर भ्रमणध्वनी क्रमांकाच्या आधारे या नागरिकांची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून पडताळण्यात येत आहे. मित्र म्हणून घरी बोलावले, पण 'तो' पत्नीच्या प्रेमात पडला आणि.... पडताळणीअंती आणि पोलीस तपासानुसार, खरी लस मिळालेल्या नागरिकांना विहित नियमानुसार कालावधी पूर्ण होताच (कोव्हॅक्सीन असल्यास 28 दिवसांनंतर / कोविशील्ड असल्यास 84 दिवसांनंतर) दुसरा डोस देण्यात येईल. तर, ज्यांना बनावट लस देण्यात आली, त्यांना योग्य कार्यवाही करुन अधिकृत लस देण्यात येणार आहे.  बनावट आणि अनधिकृत पद्धतीने खासगी स्तरावर लसीकरण झालेल्या या सर्व नागरिकांना न्याय्य व योग्य पद्धतीने अधिकृत लस देण्यासाठी आवश्यक तेथे राज्य आणि केंद्र सरकारकडून देखील मंजुरी घेण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईत आढळलेल्या 9 बनावट लस प्रकरणातील आतापर्यंत शोधलेल्या नागरिकांची यादी पोलिसांकडून महानगरपालिकेला प्राप्त झाली आहे. या नागरिकांना योग्यरित्या अधिकृत लस देण्यासाठी आवश्यक ती सर्व पडताळणी करुन कार्यवाही सुरू आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या