मुंबई, 24 जून: मुंबईतल्या दादर येथून एका बोगस डॉक्टरला (Fake Doctor) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)अटक केली आहे. रुग्णांचा जीवाचा खेळ करणारा आणि सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणारा बोगस डॉ. मुकेश कोटा याला माटुंगा पोलिसांनी बेड्या (Arrest)ठोकल्यात. एका टॅक्सी चालकावर केलेल्या शस्त्रक्रियेनंतर (Surgery)हा सर्व प्रकार उघडकीस आला.
आरोपी कोटा याला न्यायालयाचे आदेशान्वये 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर 43 वर्षीय खलीलुद्दीन खतीब असं टॅक्सी चालकाचं नाव आहे.
नेमकं कशी उघडकीस आला डॉक्टराचा प्रताप
टॅक्सी चालक हा गोरेगाव येथे राहतो. गेल्या अनेक दिवसांपासून चालक मूळव्याधीच्या त्रासानं त्रस्त होता. त्यासाठी तो उपचार करण्यासाठी चांगल्या डॉक्टरची शोधाशोध करत होता. त्यावेळी इतर टॅक्सी चालकांनी दादर टी.टी येथील गोपालराव पाईल्स सेंटरची माहिती दिली. त्यानंतर टॅक्सीचालकाने अधिक माहिती घेतली असता मुंबईत बऱ्याच ठिकाणी या सेंटरचे मूळव्याधीवर विनाशस्त्रक्रिया उपचार असे बॅनर दिसून आले.
20 फेब्रुवारी रोजी टॅक्सीचालक आपल्या पत्नीसह या क्लिनिकमध्ये गेला. एकदा ड्रेसिंग झाल्यानंतर बोगस डॉक्टरानं दुसऱ्या दिवशी पुन्हा येण्यास सांगितलं. दुसऱ्या दिवशी टॅक्सीचालक पुन्हा क्लिनिकमध्ये पोहोचला. तेव्हा छोटी शस्त्रक्रिया करावी लागेल असं डॉक्टरानं सांगितलं. काही वेळात शस्त्रक्रिया करुन डॉक्टरानं त्याच्याकडून 25 हजार रुपये घेतले.
त्यानंतर टॅक्सीचालक आपल्या पत्नीसोबत घरी जात होता. तेव्हा टॅक्सीत शस्त्रक्रिया केलेल्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. त्यातच चालक बेशुद्ध झाला. तात्काळ पत्नीनं टॅक्सी चालकाला केईएम रुग्णालयात दाखल केलं.
हेही वाचा- महाराष्ट्रातल्या राजकारणातली आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी
केईएम रुग्णालयात उपचार केल्यानंतर टॅक्सीचालकानं माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली. चालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास केला असता त्यानं याचप्रकारे अनेक शस्त्रक्रिया केल्याचे समोर आले. पोलिसांनी कोटा याला अटक केली. त्याच्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे त्यानं गेल्या तीन वर्षात जवळपास एक हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत.
हेही वाचा- 12 वीच्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टाकडून राज्य मंडळांना महत्त्वाचे निर्देश
आरोपी मुकेश कोटा याने आंध्रप्रदेश विद्यापीठातून MBBSची पदवी 2017 मध्ये प्राप्त केली असल्याचा दावा केला होता. दादर येथे गोपाल्स राव्ज पाईल्स अॅंड अॅनो रेक्टल सेंटर नावाने क्लिनीक तीन वर्षांपासून चालवत होता. त्याच्यावर आयपीसीच्या सेक्शन 337, 499,420 अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
डॉक्टर कोटा यांच्या पदवी संदर्भातील कागदपत्र महाराष्ट्र वैद्यकीय परिषद तसेच वैद्यकीय अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय, मुंबई यांच्याकडे पाठविण्यात आले. जे. जे. रुग्णालयामध्ये याबाबत तज्ज्ञसमिती गठीत करण्यात आली. त्यानंतर जेजे रुग्णालयाच्या तज्ज्ञसमितीनंही या प्रकरणाविषयी बोगस डॅाक्टरने हलगर्जीपणा केला असल्याचं आपल्या अहवालात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.