एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा 'इज बॅक', पोलीस महासंचालक कार्यालयात नियुक्ती

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा 'इज बॅक', पोलीस महासंचालक कार्यालयात नियुक्ती

प्रदीप शर्मा यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाच्या नियंत्रण कक्षात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर रुजू झाले आहेत.

  • Share this:

16 आॅगस्ट :एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची अखेर 'घरवापसी' झाली आहे. प्रदीप शर्मा यांची नियुक्ती सीनिअर पीआय अर्थात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर झालीय. पोलीस महासंचालक कार्यालयाच्या नियंत्रण कक्षात त्यांनी आपल्या पदाचा कार्यभारही स्विकारलाय.

1983 बॅचचे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची कारकिर्द वादातीत राहिली. शर्मा यांच्या नावावर एकूण 100 पेक्षा जास्त एन्काऊंटरची नोंद आहे. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीवर "अब तक 56" चित्रपट साकारला होता.

प्रदीप शर्मा यांना 2006 मध्ये लखन भैय्या फेक एन्काऊंटर प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी सत्र न्यायालयाकडून त्यांना लगेच जामीनही मिळाला होता. पण, याच प्रकरणात सिनिअर पीआय प्रदीप सुर्यवंशीसह 13 पोलीस आणि इतर 8 जण दोषी आढळल्यामुळे प्रदीप शर्मा यांनी सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं. न्यायालयातून मुक्तता झाल्यानंतर बडतर्फ निर्णयाला प्रदीप शर्मा यांनी आव्हान दिलं होतं आणि त्याचा निर्णय त्यांच्याच बाजूने लागला.

90 च्या दशकात मुंबईमध्ये जेव्हा अंडरवर्ल्डने हातपाय पसरवले होते. तेव्हा पोलिसांनी अंडरवर्ल्ड राज संपवण्यासाठी एन्काऊंटर मोहीम हाती घेतली होती. मात्र, यानंतर एनकाऊंटरमध्ये सहभागी असलेले पोलीस अधिकारी वेगवेगळ्या गँगकडून सुपारी घेत असल्याचा आरोप होऊ लागला. 2006 मध्ये लखन भय्या एन्काऊंटर प्रकरण सुद्धा सुपारी किलिंग म्हणून झालं असा संशय निर्माण झाला होता.

दोनच दिवसांपूर्वी गृहमंत्रालयाने प्रदीप शर्मा यांच्या पुन्हा सेवेत रूजू होण्याचा मार्ग मोकळा करून दिला होता. आज प्रदीप शर्मा यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाच्या नियंत्रण कक्षात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर रुजू झाले आहेत.

First published: August 16, 2017, 8:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading