Home /News /mumbai /

यंत्रणेत गोंधळ; कोरोना लशीचा दुसरा डोस घेण्यासाठी आलेले अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी माघारी

यंत्रणेत गोंधळ; कोरोना लशीचा दुसरा डोस घेण्यासाठी आलेले अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी माघारी

16 जानेवारीला ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असे सगळे लाभार्थी किंवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी लसीचा दुसरा डोस घेण्यास आजपासून पात्र ठरले आहेत

मुंबई, 15 फेब्रुवारी : कोविड-19 च्या लशीचा पहिला डोस ज्यांनी 16 जानेवारीला घेतला त्यांचा दुसरा आणि शेवटचा डोस आज पासून दिला जात आहे. त्यासाठी अनेकजण लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचले खरे पण अनेकजणांना लस न घेताच माघारी परतावं लागलं. को-विन अॅप मधील तांत्रिक बिघाड अजूनही दुरुस्त न झाल्याने त्यांना लस देण्यात अडचण येत आहे. लसीचा दुसरा डोस लाभार्थ्यांना देण्याआधी लसीकरण केंद्रांवर लाभार्थ्यांची कोविन अॅप ची नोंद तपासली जाते. लाभार्थ्यांच्या नावासमोर 'पार्शली वॅक्सिनेटेड' असं लिहिलं असेल तरच लसीचा दुसरा डोस दिला जातो. पण अनेकांची अशी नोंद दिसलीच नाही, नाईलाजाने लसीकरण केंद्रावरून त्यांना परत पाठवण्यात आलं आणि एक आठवड्याने पुन्हा एकदा येण्यास सांगितलं गेलं आहे. त्यामुळे मुंबईतील नायर रुग्णालयात जिथे 380 लाभार्थी लसीचा दुसरा डोस घ्यायला येणं अपेक्षित होतं तिथे मात्र सकाळी 11 वाजेपर्यंत अवघ्या 4 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि सिरम इन्स्टिटय़ूटची कोविशील्ड अशा दोन्ही लसींचा दुसरा डोस हा 28 दिवसांनंतर घ्यायचा आहे. त्यामुळे 16 जानेवारीला ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असे सगळे लाभार्थी किंवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी लसीचा दुसरा डोस घेण्यास आजपासून पात्र ठरलेत. किंबहुना त्यांनी लसीच्या पहिला डोस घेतल्यानंतर 4 ते 6 आठवड्यांच्या कालावधीत दुसरा डोस घ्यायचा आहे. सोमवारपासून महाराष्ट्रात दुसरा डोस द्यायला सुरुवात केल्यानंतर अॅप मधील तांत्रिक अडचणी पुन्हा एकदा समोर आल्या. हे ही वाचा-..तर पुन्हा लॉकडाऊन करणार लागू; ठाकरे सरकारकडून अलर्ट 'आम्ही आमच्या वरिष्ठांशी या अॅप मधील अडचणीबाबत बोललो आणि त्यानंतर ठरविण्यात आलं की ज्यांच्या नावाची नोंद लसीचा पहिला डोस घेतलेल्या यादीत अॅप वर दिसत असेल त्यांनाच लस द्यावी', ही माहिती डॉ. रुपाली राजपूत यांनी दिली, ज्या नायर रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर पर्यवेक्षिक म्हणून काम करतात. महाराष्ट्रात आजपासून कोविड लसीचा दुसरा डोस दिला जात आहे. दुसरा डोस घेतला तरच या लसीचा फायदा होईल, तोही दुसऱ्या डोस घेतल्यानंतरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर. त्यामुळे दुसरा डोस घ्यायला आळस करू नका. दुसरा डोस घेतल्यानंतरच लसीकरण पूर्ण केल्याचं प्रमाण पत्र मिळणार. पण अॅप मध्ये नाव दिसलं नाही आता परत कशाला जा? असा विचार अजिबात आणू नका. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री सुरेश काकाणी यांच्या मते' हा केंद्र सरकारचा ऍप असल्याने त्यातील दुरुस्ती किंवा इतर बाबींचा भाग आमच्याकडे येत नाही. पण लाभार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही आता जर त्यांना परत पाठवत असलो तरी त्यांच नाव अॅप वर दिसताच आम्ही या लाभार्थ्यांना फोन करून आणि मेसेज करून पुन्हा बोलावू.' 16 जानेवारीला कोविड लसीकरण सुरू होण्याच्या आधीपासूनच या अॅपमध्ये अनेक त्रुटी जाणवल्या. जसं लोकांची नावं लसीकरणासाठी नोंदवली गेली, तरी अनेकांना मेसेज गेले नाहीत. आणि पहिल्याच दिवशी गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर आज ही मोहीम सुरू झाल्याला एक महिना उलटला तरी त्यातील अडचणी दूर झाल्या नाहीत. त्यामुळे लसीकरणाच्या दुसरा डोस घ्यायला तर अनेकांना अनंत अडचणींना सामोरे जावं लागतंय पण दुसरीकडे मात्र पहिला डोस घेण्यासाठीही लोकांना उठाठेव करावी लागतेय.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Mumbai

पुढील बातम्या