एलफिन्स्टन स्टेशनवर मृत्यूचं तांडव,चेंगराचेंगरीत 22 जणांचा बळी

एलफिन्स्टन ब्रीजवर चेंगराचेंगरी होऊन 22 जण दगावलेत तर 39 लोकल प्रवाशी जखमी झालेत.

Chandrakant Funde | Updated On: Sep 29, 2017 10:21 PM IST

एलफिन्स्टन स्टेशनवर मृत्यूचं तांडव,चेंगराचेंगरीत 22 जणांचा बळी

मुंबई, 29 सप्टेंबर : . मुंबईतील एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर ही चेंगराचेंगरी झालीय. या घटनेत 22 प्रवाशांचा गुदमरून मृत्यू झाला आहे, तर 39 प्रवासी जखमी झाले आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची तर गंभीर जखमींना 1 लाखांची मदत तर किरकोळ जखमींना 50 हजारांची मदतीची रेल्वमंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली.

आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास ब्रिज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रिजवरील प्रवाशांचा एकच हलकल्लोळ माजला आणि त्यातूनच चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर परळमधील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील एल्फिस्टन स्टेशन आणि मध्य रेल्वेवरील परेल स्टेशनला जोडणारा पूल आहे. या पुलावर प्रवाशांसाठी अरुंद वाट असल्यामुळे कायम गर्दी होते. ऑफिसला जाण्याची वेळ असल्यामुळे या भागात गर्दी होती.

अग्निशमन दल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणली. सुरुवातीला वाहतूक आणि प्रवाशांसाठी हा ब्रिज तात्पुरता बंद ठेवण्यात आला होता. दुपारी पुन्हा हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

एलफिस्टन रेल्वे स्टेशनवर झालेली चेंगराचेंगरी चिंचोळ्या फूट ओव्हरब्रिजमुळे झाल्याचा आरोप होऊ लागलाय. ब्रिटीशकाळातले हे फूटओव्हर ब्रिज आहेत. दरम्यानच्या काळात परळ आणि एलफिस्टन स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली पण फूट ओव्हर ब्रिजचा आकार तेवढाच राहिला. रेल्वे प्रशासनाने या पुलांसाठी पर्याय शोधलाच नाही. त्यामुळे रोज सकाळ आणि संध्याकाळच्या काळात या अरुंद पुलांवर तुफान गर्दी होते. ज्या जिन्यावरून उतरताना चेंगराचेंगरी झाली तो ब्रिजही अतिशय चिंचोळा आहे. रेल्वेच्या याच बेपर्वा वृत्तीमुळे अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय.

प्रवासी संघटनांनी या पुलांबाबत माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंकडे पाठपुरावा केला होता. पण दुर्दैवानं त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

मध्य रेल्वेवर दादरच्या दिशेनं पूल बांधण्यात आला. पण तो अतिशय गैरसोईचा झालाय. रेल्वेनं या दुर्घटनेपासून धडा घेऊन एलफिस्टन फूट ओव्हरब्रिजचं नव्यानं बांधकाम होईल ही अपेक्षा आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 29, 2017 11:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close