मुंबई, 10 जुलै: डायलिसिसची मशीन फुटल्यानं (Dialysis Machine Burst) मालाडमधील एका महिलाचा दुर्दैवी मृत्यू (Woman death) झाला आहे. डायलिसिसची मशीन फार जुनी असल्यानं हा अपघात (Accident) घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. मृत महिला राहात्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.
सुलोचना यादव असं मृत महिलेचं नाव असून त्या मुळच्या उत्तर प्रदेशातील रहिवासी असून त्या सध्या मालाड याठिकाणी वास्तव्याला होत्या. सुलोचना यादव यांना किडनीचा त्रास असल्यानं मागील बऱ्याच वर्षापासून त्या डायलिसिस करत होत्या. त्यासाठी त्यांनी स्वतः घरीच डायलिसिसची मशीन विकत घेतली होती. मृत सुलोचना यांच्या पतीची मालाड पूर्वेला गोकुळनगर परिसरात पीठाची गिरण होती. पण 2006 साली त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यामुळे त्या आर्थिक परिस्थितीशी झगडत होत्या.
हेही वाचा -चिंताजनक! म्हशींमध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; माणसांसाठी ठरणार घातक?
दरम्यान त्यांची डायलिसिसची मशीनही फार जुनी झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी देखील मशीन बदलण्याचा सल्ला दिला होता. पण आर्थिक परिस्थितीमुळे त्या डायलिसिसची मशीन बदलू शकल्या नाहीत. सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, काल सकाळी अचानक मशीन फुटल्यानं सुलोचना गंभीर जखमी झाल्या. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सुलोचना यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
हेही वाचा -डेल्टा + व्हेरिएंटपेक्षा धोकादायक असलेला 'लॅम्बडा' वाढवणार भारताची चिंता?
याप्रकरणी कुरार पोलीसांनी आसपासच्या लोकांची चौकशी करून जबाब नोंदवून घेतले आहेत. घटनास्थळी सुलोचना रक्ताच्या थारोळ्यात आढळल्या होत्या. यामुळे त्यांच्या मृत्यूमागं आणखी काही कारणं आहेत का? याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्या अनुषंगानं पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.