मुंबई, 25 जून : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या आमदारांना फोडून शिवसेनेला धक्का दिला आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात सुरुवात झाली आहे. आता एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालय शिवसैनिकांनी फोडले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसैनिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून बंडखोर आमदारांना गद्दार म्हणून निदर्शनं करत आहे तर कुठे पुतळे जाळत आहे. आता या शिवसैनिकांच्या उद्रेकाचा फटका एकनाथ शिंदे यांच्या मुलाला बसला आहे.
मुंबई जवळील उल्हासगरमध्ये शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. गोल मैदान भागात श्रीकांत शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय कार्यकर्त्यांनी फोडले. श्रीकांत शिंदे यांचे पोस्टर फाडून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
मुंबईमध्ये जमावबंदी लागू
राज्यात अभुतपूर्व असा राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. शिवसेनेतील आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाल्यामुळे शिवसैनिक कमालीचे संतापले आहे. ठिकठिकाणी आमदारांचे कार्यालय टार्गेट केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट झाली आहे. मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयांना सुरक्षा दिली जाणार आहे. एवढंच नाहीतर सोशल मीडियावर सुद्धा पोलिसांचे विशेष टीम लक्ष ठेवणार आहे. हिंसक बॅंनर पोस्टर तात्काळ काढण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. राज्यात सध्या राजकीय परिस्थिती आहे त्यानुसार हे आदेश जारी केले आहे. त्याचबरोबर सर्व पक्षांना आणि कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी शांततेचे आवाहन केलं आहे.
दरम्यान, राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले केले जात आहे. आज सकाळी शिंदे समर्थक आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या पुण्यातील कार्यालयाची संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड केली. पुण्यातील बालाजी नगर भागात सावंत यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांच्या भैरवनाथ साखर कारखान्याचे कार्यालय आहे. या कार्यालयाला शिवसैनिकांनी लक्ष्य केलं. या तोडफोडीनंतर तानाजी सावंत यांनी फेसबुकवर पोस्ट करून शिवसैनिकांचा इशारा दिला.
तर दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनीही आता एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे समर्थकांना एकत्र जमण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वाद पेटू नये म्हणून पोलिसांनी नवे आदेश दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.