Home /News /mumbai /

एकनाथ शिंदे मंत्रीपदाचा राजीनामा देणार, सूत्रांची माहिती, गुजरातमध्ये घडामोडींना वेग

एकनाथ शिंदे मंत्रीपदाचा राजीनामा देणार, सूत्रांची माहिती, गुजरातमध्ये घडामोडींना वेग

महाविकास आघाडी सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. कारण शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंंदे आज संध्याकाळी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहे.

    मुंबई, 21 जून : महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi) संकटाचे ढग दाटून आले आहेत. कारण शिवसेनेचा बडा नेता अशी ओळख असलेले ठाण्याचे जिल्हाप्रमुख आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात बंड पुकारलं आहे. या बंडाची शिवसेनेसह (Shiv Sena) महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) मोठी झळ बसण्याची दाट शक्यता आहे. कारण एकनाथ शिंदे आज संध्याकाळी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा (Eknath Shinde resign) देणार आहेत. शिंदे यांच्यासोबत शिवेसेनेचे तब्बल 35 आमदार आहेत. 'एबीपी माझा'ने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे. शिंदे आज संध्याकाळी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत देखील प्रचंड घडामोडी घडत आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अहमदाबाद येथील घरी गेल्याची चर्चा आहे. तर एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुजरातच्या सूरत शहरमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले आहेत. (महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के, आधी शिवसेनेचे आता काँग्रेसचे काही आमदार नॉट रिचेबल) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत अमित शहा यांची समोरासमोर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व बंदोबस्त केला जातोय. विशेष म्हणजे शिंदेंच्या समर्थक आमदारांना गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगर येथील फार्म हाऊसवर नेलं जाणार आहे. त्यासाठी सूरतच्या हॉटेलमधून या सर्व आमदारांचं एअर लिफ्टिंग केलं जाणार आहे. त्यामुळे शिंदे सत्तेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना जोर वाढू लागला आहे. दरम्यान, गुजरातमध्ये प्रचंड घडामोडी घडत आहेत. कारण गुजरातचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील हे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या भेटीला गेले आहेत. तिथे दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये पुढील रणनीतीबाबत चर्चा होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या