Home /News /mumbai /

'महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणं गरजेचं', मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदे आक्रमक

'महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणं गरजेचं', मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदे आक्रमक

शिवसेनेतून बंडखोरी करुन गुवाहाटीला निघून गेलेले नेते एकनाथ शिंदे हे आपल्या भूमिकेपासून मागे हटायला तयार नाहीत.

    मुंबई, 22 जून : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडू शकतो. कारण शिवसेनेतून बंडखोरी करुन गुवाहाटीला निघून गेलेले नेते एकनाथ शिंदे हे आपल्या भूमिकेपासून मागे हटायला तयार नाहीत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांना आणि त्यांच्या समर्थक आमदारांना आवाहन केलं तरी ते परत येण्यास तयार नाहीत, याउलट त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हनंतर ट्विटरवर आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी 1, 2, 3 आणि 4 असे आकडे टाकत चार मुद्दे टाकले आहेत. त्यांच्या या चार मुद्द्यांवरुन त्यांना शिवसेनेला सत्तेत राहू द्यायचंच नाही, हे स्पष्ट होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलेले चार मुद्दे नेमकं काय? 1) गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला. 2) घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. 3) पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक. 4) महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद झाल्यानंतर त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारवर ओढावलेल्या पेच प्रसंगावर मंथन झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राजीनामा द्यायची तयारी आहे. ते वर्षा सोडून त्यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानी जाण्याच्या विचारात आहे. विशेष म्हणजे त्यांनी फेसबुक लाईव्हमध्येही याबाबत उल्लेख केला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी ठाकरेंना मोलाचा सल्ला दिला. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा सल्ला दिला. ('...तर मुख्यमंत्र्यांवर ही मोठी नामुष्की', पवार-ठाकरे भेटीत नेमकी चर्चा काय?) शिवसेना कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'वर्षा' निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता त्यांच्या 'मातोश्री' या खासगी निवासस्थानाकडे लवकरच रवाना होणार आहेत. याबाबतची माहिती समोर आल्यानंतर शेकडो शिवसैनिक 'वर्षा' बंगल्याबाहेर तसेच मुंबईतील ठिकठिकाणी दाखल झाले आहेत. मुंबईतील अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भावनिक साद घातली जात आहे. शिवसैनिकांचा आक्रोश त्यांच्या डोळ्यांमधून दिसत आहे. वर्षा बंगल्याबाहेर शिवसैनिकांनी प्रचंड मोठी गर्दी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाचा आणि पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देतो, असं विधान केल्याने शेकडो शिवसैनिक मुख्यमंत्र्यांना साद घालण्यासाठी आले आहेत.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Shiv sena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या