मुंबई 21 ऑक्टोबर: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला धक्का बसला आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेव दानवे यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय हा त्यांच्या स्वत:साठीच अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी भाजप सोडायला नको होते. ज्या पक्षाने त्यांच्यावर टीका केली, भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच पक्षात ते गेले, हे सगळं टाळता आलं असतं असं मतही त्यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना व्यक्त केलं.
रावसाहेब दानवे म्हणाले, राजकारणात जरा धीर धरावा लागतो. काही काळ जावू द्यावा लागतो. खडसेंच्या बाबतीत भाजपमध्ये मतभेद नव्हते. सगळ्यांनाच ते राहावे असंच वाटत होतं. मात्र काही गोष्टी या न्यायप्रविष्ट होत्या. त्यासाठी वाट पाहायला पाहिजे होतं. 40 वर्ष त्यांनी पक्षाचं काम केलं. तळातल्या कार्यकर्त्यापासून ते विरोधी पक्षनेते आणि मंत्रिमंडळातले महत्त्वाचे मंत्री असा त्यांचा प्रवास झाला त्यामुळे त्यांच्या जाण्याने दु:खच झालं.
मात्र ते ज्या पक्षात जात आहेत त्या पक्षानेच त्यांच्यावर टीका केली होती. खडसे थोडे थांबले असते तर सगळं निस्तरता आलं असतं. मात्र तसं झालं नाही. आता दिल्या घरी त्यांनी सुखी राहावे. ते तिकडे गेले असले तरी ते आमचे मित्र आहेत असंही दानवे यांनी सांगितलं.
जयंत पाटील काय म्हणाले?
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपच्या सदस्याचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांचं आम्ही पक्षात स्वागत करत आहोत. शुक्रवारी दुपारी 2 वाजता त्यांचा पक्षात प्रवेश होईल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
भाजप पक्ष सोडतोय, घोषणा करताना एकनाथ खडसे झाले भावुक!
'भारतीय जनता पक्षाचे गेले तीन ते साडेतीन दशक नेतृत्व करणारे नेते, आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत अनेक वर्ष काम केले आहे. त्यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
'एकनाथ खडसे यांचा शुक्रवारी प्रवेश होत आहे. त्यानंतर त्यांना काय जबाबदारी दिली जाणार हे नंतर ठरणार आहे, असं ही पाटील यांनी सांगितले.