मुंबई,2 जानेवारी: विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरून राजकारण तापलं आहे. भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी आता पुन्हा बंडाचे निशाण फडकावले आहे. मुलीच्या पराभवास व आपले तिकीट कापण्यात पक्षातील काही लाेकांचा हात असल्याचा आराेप करणारे एकनाथ खडसे यांनी आता थेट संबंधित नेत्यांची नावंच जाहीर केली आहे. एकनाथ खडसे एका मराठी वृत्तवाहिनीशी बाेलत होते. ते म्हणाले, 'मला तिकीट मिळू नये म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांनी काेअर कमिटीच्या बैठकीत नकारात्मक अहवाल दिला होता. या कमिटीतील माझ्या जवळच्या मित्रांनीच मला ही माहिती दिली,' असा खळबळजनक गाैप्यस्फाेट खडसे यांनी केला आहे.
'जे. पी. नड्डा यांच्यासाेबत झालेल्या बैठकीत मी त्यांना ही सर्व माहिती दिली आहे. त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले तरी माझे समाधान झालेले नाही. मात्र मी भाजप साेडणार नाही, असेही खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
नाथाभाऊ शिवसेनेच्या संपर्कात..
जळगाव जिल्हा परिषदेवर एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे ही जिल्हा परिषद भाजपच्या हातातून हिसकावून घेण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसेंची शिवसेनेला साथ मिळण्याची शक्यता असून शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी तसे संकेत दिले आहेत. एवढेच नाही तर त्यांनी एक मोठा गौप्यस्फोटही केला. नाथाभाऊ हे आपल्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितल आहे. त्यामुळे पुढच्या काही काळात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, जिल्हा परिषद ही शिवसेनेच्या ताब्यात येणार आहे. अनेक लोक आमच्या संपर्कात असून त्याबाबात जास्त काही आताच सांगणार नाही. आतापर्यंत खडसे हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होत. खडसे यांनी याआधी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एकनाथ खडसे यांनी पक्षातील आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.