Home /News /mumbai /

मोठी बातमी, एकनाथ खडसेंचा थेट मोदींवर निशाणा, भाजपच्या गोटात खळबळ

मोठी बातमी, एकनाथ खडसेंचा थेट मोदींवर निशाणा, भाजपच्या गोटात खळबळ

राष्ट्रवादीत प्रवेश करण्याआधीच एकनाथ खडसे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई, 21 ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. 22 तारखेला त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित मानला जात आहे. पण, राष्ट्रवादीत प्रवेश करण्याआधीच एकनाथ खडसे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी देशाला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी कोरोनाची परिस्थिती अजून टळली नाही. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. 'आपल्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र, यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला' अशी टीका करणारे ट्वीट जयंत पाटील यांनी केले होते. एकनाथ खडसे यांनी जयंत पाटील यांचे ट्वीट हे रिट्वीट केले आहे. एकाप्रकारे जयंत पाटील यांच्या टीकेचं एकनाथ खडसे यांनी समर्थन केले आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे ते राष्ट्रवादीवासी झाल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि त्याची तारीख याबद्दल खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या विश्वासू कार्यकर्त्याने माहिती दिली. 'एकनाथ खडसे हे 22 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा सोहळा होईल. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादीत दाखल होतील. समर्थकांना सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे,' असं या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, अजूनही भाजप नेत्यांकडून एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जातील याबद्दल खंडन करण्यात आले आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खडसे हे भाजप सोडून जाणार नाही, असा दावा केला आहे. तर पंकजा मुंडे यांनीही एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडू नये, असं म्हटलं आहे. पण, जळगावात खडसे समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेशासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: BJP, NCP, एकनाथ खडसे, जयंत पाटील, भाजप, राष्ट्रवादी

पुढील बातम्या