मुंबई, 28 जुलै: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडी (ED) च्या अधिकाऱ्यांनी आता अहमदनगर (Ahmednagar)मध्ये दाखल होत चौकशी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी राजू भुजबळ अधिकाऱ्याच्या गावात दाखल होत त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा जबाब ईडीने नोंदवला आहे. मुंबई पोलिसांत उपायुक्त पदावर कार्यरत असलेले राजू भुजबळ यांचे मुळ गाव अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यात आहे. या ठिकाणी ईडीचे पथक दाखल झाले आणि त्यांचा जबाब नोंदवला आहे.
या बाबत स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती नसून दोन वाहनां मधून हे अधिकारी आले असल्याची माहिती समोर येत आहे. या पोलीस अधिकाऱ्याच्या नातेवाईकांची चौकशी करून हे पथक माघारी परतले. आज सकाळी याबाबत सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.
SIT करणार परमबीर सिंह यांच्याविरोधात असलेल्या गुन्ह्याचा तपास, मुंबई पोलिसांकडून नेमणूक
100 कोटी वसूली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन PA ना अटक केली आहे. तसेच न्यायालयाच्या परवानगीने तळोजा जेलमध्ये जाऊन सचिन वाझे याची देखील ईडीने चौकशी केली होती. या चौकशीत 100 कोटी वसूली प्रकरणी काही महत्वाची माहिती ईडीच्या हाती लागलीये असं कळतंय. काही महत्व पुर्ण बैठका झाल्या होत्या यामध्ये अनिल देशमुख यांच्याशी संबंधीत काही व्यक्ती होत्या तसेच वरीष्ठ पोलीस अधिकारी होते अशीही माहिती समोर येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीला काही नवीन व्हॉटसपअप मेसेज आणि कॉल डिटेल्स मिळाले आहेत, ज्या संबंधी ईडी पुन्हा अधिकाऱ्यांचे जबाब घेत आहे. यात काही नवीन ठिकाणांवर माहिती समोर आली आहे ज्याबाबत ईडी चौकशी करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ED, Mumbai police