मुंबई, 11 मे: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोप प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात आता अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे.
अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. आता या प्रकरणात ईडीने सुद्धा एंट्री केली आहे. ईडीने अनिल देशमुख यांच्यावर ECIR म्हणजेच एफआयआर दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांच्या विरोधात प्राथमिक तपास करून त्या तपासाच्या आधारावर ती अनिल देशमुख यांच्यावर 21 एप्रिल या दिवशी दुपारी 4 वाजता सीबीआयच्या दिल्ली येथील पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. या एफआयआरच्या अनुषंगाने सीबीआयने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते.
सीबीआय प्राथमिक तपासात देशमुख यांच्या अनेक जवळच्या व्यक्तींचे जबाब नोंदवले होते. याच एफआय आरच्या आधारे ED ने गुन्हा दाखल केला असून अनिल देशमुख यांच्यासह पाच अनोळखी व्यक्तींविरोधात ED ने हा एफआयआर दाखल केला आहे.
सीबीआयने अनिल देशमुख 100 कोटी वसुली प्रकरणी तपास गेला होता. त्या तपासात मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच काळा पैसा परदेशात पाठवणे यासारख्या काही गोष्टी समोर आल्या होत्या याची माहिती सीबीआयने ED ला दिली होती.
याच माहितीचा अभ्यास करून प्राथमिक तपास करून ED ने अनिल देशमुख यांच्या विरोधात शंभर कोटी वसुली प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती ED सूत्रांनी दिली. यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून लवकरच देशमुख यांना या प्रकरणी चौकशी करता बोलवणार असल्याची माहिती देखील ED च्या अधिकार्यांनी दिली आहे.
तत्पूर्वी सीबीआय प्रमाणेच ED देखील काही ठिकाणी छापे मारण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता ED नेमकी आणि देशमुख यांच्यावर ती काय कारवाई करतं किंवा त्यांची चौकशी कधी करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
CBI च्या FIR मध्ये काय?
अनिल देशमुख यांच्यावर दिल्लीत एफआयआर दाखल करण्यात आला. तसंच अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. अनिल देशमुख यांचं नाव आरोपी म्हणून एफआयआरमध्ये नोंद करण्यात आले आहे. तसंच, सचिन वाझे यांच्या नियुक्तीत अनिल देशमुख यांचा हात असल्याचेही FIR कॉपीमध्ये नमूद करण्यात आले आहे. एवढंच नाहीतर पदाचा गैरवापर केल्याचा ठपका सुद्धा अनिल देशमुखांवर करण्यात आला आहे.
अनिल देशमुख यांची हायकोर्टात धाव!
दरम्यान, 100 वसुली आरोपांची प्राथमिक तपास करत सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी अनिल देशमुख यांनी मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाकडे याचिका दाखल केली आहे. न्यायधीश एस.एस. शिंदे आणि मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे याच आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ED