मुंबई, 27 डिसेंबर : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना EDकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. तसंच वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही समजते.
'ईडी समन्स बाबतीत मला कल्पना नाही, मला माहीत नाही. ईडी समन्स आलं असेल तर मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देईन,' अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
भाजप नेत्यांचा हल्लाबोल
पीएमसी संदर्भात राऊत यांचे आधी काही संबंध होते का याचा खुलासा राऊत करतील का? त्यांनी ईडीला सहकार्य करावं, अशी खोचक प्रतिक्रिया भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तर दुसरीकडे, भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनीही संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मुंबई पोलीस यंत्रणा वागते त्याचे समर्थन शिवसेना करते आणि ईडी नोटीस आली की सूडाचं राजकारण असं कसं म्हणतात? असा सवाल राम कदम यांनी केला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटीस बजावण्यात आली, तर अगदी अलीकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही ईडी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.