Home /News /mumbai /

अनिल देशमुख प्रकरणी सीताराम कुंटेंची सलग सहा तास चौकशी, नेमकं काय-काय घडलं?

अनिल देशमुख प्रकरणी सीताराम कुंटेंची सलग सहा तास चौकशी, नेमकं काय-काय घडलं?

अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री असताना सीताराम कुंटे हे गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. त्याच पार्श्वभूमीवरुन काहीतरी महत्त्वाची माहिती मिळेल या उद्देशाने ईडी अधिकाऱ्यांनी तब्बल 6 तास सीताराम कुंटे यांची चौकशी केली.

पुढे वाचा ...
  मुंबई, 7 डिसेंबर : राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) आज ईडी (ED) कार्यालयात दाखल झाले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरणी जबाब नोंदविण्यासाठी ते आज ईडी कार्यालयात दाखल झाले. ईडी अधिकाऱ्यांनी तब्बल 6 तास सीताराम कुंटे यांची चौकशी केली. ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात सीताराम कुंटे यांचा जबाब नोंदविण्याचं काम तब्बल 6 तास सुरु होतं. अनिल देशमुख यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत आरोप करण्यात आला होता. देशमुख गृहमंत्री असताना पोलिसांच्या बदल्या करताना मनी लॉन्ड्रिंग झाली का? या विषयी कुंटे यांची चौकशी करण्यात आली. अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री असताना सीताराम कुंटे हे गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळेल, अशी ईडीला आशा होती. विशेष म्हणजे ईडीने याआधी कुंटे यांना तीन वेळा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. पण त्या तीनही वेळा कुंटे यांनी प्रशासकीय कामे आणि मंत्रिमंडळ बैठकीचं कारण सांगितलं होतं. तीनवेळा गैरहजर राहिल्यानंतर कुंटेंनी ईडीकडून वेळ मागवून घेतला होता. त्यानंतर अखेर कुंटे यांची चौकशी करण्यात आली. हेही वाचा : शिवसेना आता यूपीएत सहभागी होणार? राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणतात...

  नेमकं प्रकरण काय?

  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काही महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून मोठा लेटरबॉम्ब टाकला होता. तत्त्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित एपीआय सचिन वाझेला दरमहिन्याला 100 कोटींच्या वसुलींचं टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. या प्रकरणी देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय अनिल देशमुखांना देखील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. हेही वाचा : दिल्लीतली राष्ट्रवादीची बैठक संपली, मोदींविरोधात पर्याय देण्यासाठी ठरली रणनीती विशेष म्हणजे परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर फोन टॅपिंग प्रकरण समोर आलं होतं. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या त्यावेळी राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख होत्या. त्यांनी राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावरुन राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या या अहवालानंतर गृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी चौकशी करत राज्य सरकारकडे अहवाल सादर केला होता. त्या अहवालात त्यांनी रश्मी शुक्ला यांनी खोटे बोलून फोन टॅपिंगची परवानगी घेतली होती, असं सांगितलं होतं. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ईडीकडून आज सीताराम कुंटे यांची चौकशी करण्यात आली.
  Published by:Chetan Patil
  First published:

  पुढील बातम्या