खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

'खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे पक्षामध्ये हार्दिक स्वागत.'

  • Share this:

मुंबई 23 ऑक्टोबर: एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पक्षातल्या सर्वच नेत्यांनी खडसे यांचं स्वागत केलं आहे. खडसे यांच्यामुळे पक्षाला बळ असेल अशी सर्वांची भावना आहे. या प्रतिक्रिया येत असताना सगळ्यांना प्रतिक्षा होती ती अजित पवारांच्या प्रतिक्रियेची. कारण अजित पवार नाराज आहेत अशी चर्चा सोशल मीडियावर होत होती. त्यानंतर मुख्य कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनीही त्यावर सविस्तर खुलासा केला. नंतर अजित पवारांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

अजित पवार म्हणाले, राज्याचे ज्येष्ठ नेते, माननीय  एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी राष्ट्रवादी पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. मा.खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे.

खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. खडसेसाहेब, रोहिणीताई खडसे, त्यांच्यासह पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे पक्षामध्ये हार्दिक स्वागत! पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल, असा विश्वास देतो असंही अजित पवारांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, काही लोक अजित पवार नाराज आहेत अशी चर्चा करत आहे. अजित पवार हे नाराज असण्याचं काहीही कारण नाही. फक्त कोरोनाचं संकट असल्याने काळजी घ्यावी लागते, त्यामुळे ते घरी आहेत असं सांगत त्यांनी चर्चेला विराम जेण्याचा प्रयत्न केला. पवार म्हणाले, गेले काही दिवस फक्त नाथाभाऊ हाच विषय माध्यमांमध्ये होता. आज आता वेगळाच विषय काढला की अजित पवार नाराज आहेत म्हणून, पण नाराजी असण्याचं काहीच कारण नाही.

जयंत पाटील काय म्हणाले?

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करत असताना आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात वेगळं दृष्य दिसलं. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याची शरद पवारांची सूचना असतानाही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नावं न घेता सूचक इशारा दिला. यावेळी जे टीव्हीवर हा कार्यक्रम पाहात असतील त्यांना आता कळलं असेल की टायगर जिंदा है, पिक्चर अभी बाकी है असं जयंत पाटील म्हणाले.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 23, 2020, 6:28 PM IST

ताज्या बातम्या