राष्ट्रवादीचे मंत्री म्हणाले, इंदू मिल कार्यक्रमाच्या नियोजनातच होती त्रुटी, तर मुख्यमंत्र्यांनीही दिले स्पष्टीकरण

राष्ट्रवादीचे मंत्री म्हणाले, इंदू मिल कार्यक्रमाच्या नियोजनातच होती त्रुटी, तर मुख्यमंत्र्यांनीही दिले स्पष्टीकरण

कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : मुंबईतील दादर इथं इंदू मिलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. परंतु, अपुऱ्या नियोजनाअभावी आज नियोजित केलेल्या पायाभरणीचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करावा लागला. या कार्यक्रमाच्या नियोजनातच त्रुटी होती, अशी कबुलीच राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली. तर लवकरच कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रम नियोजन करताना त्रुटी होत्या अनेकांना निमंत्रण नव्हते. मी कॅबिनेट मंत्री असूनही मला देखील निमंत्रण नव्हते. या त्रुटी दूर करून आता पुन्हा कार्यक्रम नियोजन केले जाईल, अशी माहिती मलिक यांनी दिली.

कार्यक्रमाचे नियोजन करत असताना आंबेडकर यांच्या वारसांना याबद्दल माहिती दिली गेली नाही, काही नेत्यांना आणि मंत्र्यांना ही याची माहिती दिली नव्हती त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता, असंही मलिक यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याहून सकाळीच निघाले होते. त्यांचा ताफा हा वाशीपर्यंत पोहोचला होता. ऐनवेळी कार्यक्रम रद्द करण्यात आला अशी माहिती कळताच अजितदादांना यू-टर्न घ्यावा लागला. त्यांनी वाशीवरूनच आपला ताफा वळवत पुन्हा पुण्याच्या दिशेनं प्रवास सुरू केला.

तर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे पायाभरणी कार्यक्रमासाठी हजर राहण्यासाठी इंदू मिलच्या परिसरात पोहोचले ही होते. पण, कार्यक्रम रद्द झाल्याचे कळताच धनंजय मुंडे यांनाही माघारी परतावे लागले.

सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार - मुख्यमंत्री

दरम्यान, इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले. मात्र, अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व  आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश मी दिले आहेत.

त्यामुळे कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Published by: sachin Salve
First published: September 18, 2020, 3:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या